ग्रामीण भागातील ‘गोबरगॅस’ कालबाह्य
By Admin | Updated: May 11, 2015 00:33 IST2015-05-11T00:33:12+5:302015-05-11T00:33:12+5:30
ग्रामीण भागात शेतीच्या कामात ट्रॅक्टरसह दुसऱ्या यंत्राचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने शेतकऱ्यांना जनावरांना...

ग्रामीण भागातील ‘गोबरगॅस’ कालबाह्य
गोंदिया : ग्रामीण भागात शेतीच्या कामात ट्रॅक्टरसह दुसऱ्या यंत्राचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने शेतकऱ्यांना जनावरांना पाळणे कठीण झाले आहे. परिणामी ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठी एकेकाळी महत्त्वाचा घटक असणारा ‘गोबर गॅस’ आज कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे.
भारताला कृषी प्रधान देश म्हणून ओळखल्या जाते. त्यामुळे देशात ७५ टक्के शेती व्यवसाय केला जातो. पूर्वी घरोघरी शेतकऱ्याकडे शेतीच्या उपयोगासाठी बैलासह दुधाळ जनावरे मोठ्या प्रमाणात असायची. शेतीसुद्धा संसाराच्या उपयोगाची होती. ज्यांच्या घरी शेती आहे, अशा बहुतांश शेतकऱ्यांच्या घरी गोबरगॅस सयंत्र बसविली गेली होती. त्यामुळे पाळीव जनावरांपासून दूध तर शेणापासून घरगुती वापरासाठी गॅस मिळत होता. झिरो मेन्टनन्समुळे गोबरगॅस सयंत्राचा वापर वाढला होता.
पण कालांतराने पाणी टंचाई, वैरण टंचाईमुळे तथा प्रागतिक साधने वाढल्यामुळे तसेच शेतीच्या यांत्रिक सामुग्रीत आधुनिकता आल्यामुळे गाई- बैलांचा वापर शेतीसाठी कमी प्रमाणात करण्यात येत आहे. त्यामुळे गाई- बैलांचे महत्व दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. वनातील अवैध वृक्षतोडीमुळे जलस्तराचे प्रमाणही कमी होत आहे. परिणामत: जनावरांना आवश्यक असलेल्या वैरणाची टंचाईदेखील मोठ्या प्रमाणावर आहे. पशुधनाच्या अभावामुळे गोबर गॅस कमी झाले आहे.
दिवसेंदिवस निर्माण होत असलेली पाणी व चारा टंचाईमुळे शेतकरी जनावरांना मिळेल त्या किंमतीत विक्री करीत आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या घराघरात असणारा ‘गोबरगॅस’ सयंत्र आज ग्रामीण भागातून कालबाह्य झाले आहेत. तर त्याची जागा आता गॅस सिलिंडरने घेतली आहे. कमी खर्चात संपूर्ण कुटुंबाची गरज पुर्ण करणारे इंधन या गोबरगॅस मधून मिळायचे. परंतु गोबर गॅसमध्ये टाकलेले शेण कालविण्याच्या पध्दतीमुळे अनेकांनी या गोबरगॅसकडे दुर्लक्ष करून सिलींडरच्या गॅसला पसंती दिली आहे. ग्रामीण भागातीलही गोबरगॅस दिसेनासे झाले. (तालुका प्रतिनिधी)