त्या धान खरेदी केंद्राचा परवाना रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:15 IST2021-01-13T05:15:38+5:302021-01-13T05:15:38+5:30
गोरेगाव : तालुक्यातील तिल्ली मोहगाव येथील तालुका शेतीउद्योग साधनसामग्री बहुउद्देशीय सहकारी संस्थेच्या धान खरेदीतील गैरप्रकाराची चौकशी करून सदर केंद्राचा ...

त्या धान खरेदी केंद्राचा परवाना रद्द करा
गोरेगाव : तालुक्यातील तिल्ली मोहगाव येथील तालुका शेतीउद्योग साधनसामग्री बहुउद्देशीय सहकारी संस्थेच्या धान खरेदीतील गैरप्रकाराची चौकशी करून सदर केंद्राचा परवाना रद्द करा, या मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी गोंदिया येथील प्रशासकीय इमारतीला जिल्हा पणन अधिकारी कार्यालात वाद घातला. यावेळी प्रभारी जिल्हा पणन अधिकारी बिसेन यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर शेतकरी शांत झाले.
तिल्ली मोहगाव येथे जिल्हा प्रशासनाने तालुका शेती उद्योग साधन सामग्री बहुउद्देशीय सहकारी संस्थेला धान खरेदी केंद्र मंजूर केले आहे. या केंद्रावर शेतकऱ्यांचे धान प्राधान्याने न खरेदी करता व्यापाऱ्यांचे धान खरेदी केले जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. अनेक शेतकऱ्यांनी महिना दीड महिन्यांपासून नोंदणीसाठी सातबारा अभिलेख व अन्य कागदपत्रे दिले आहेत. पण त्यांच्या नावाची नोंदणी करण्यात आली नाही. एवढेच नव्हे तर एका कट्यात ४०.६ किलोग्रॅम धानापेक्षा अधिकचे धान मोजले जात आहे. प्रतिकट्टा ११ रुपयेप्रमाणे हमाली घेतली जात असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. या केंद्राची प्रत्यक्ष चौकशी करुन संस्थेचा धान खरेदी परवाना रद्द मागणी शेतकऱ्यांनी केली. यावेळी प्रभारी जिल्हा पणन अधिकारी अजय बिसने यांनी संस्थेची चौकशी करुन कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकरी शांत झाले. यावेळी शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीच निवेदन जिल्हाधिकारी व पणन अधिकारी यांना देण्यात आले.