महसूल विभाग शंभूटोला घाटावरील माफियांवर मेहरबान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 00:34 IST2019-02-02T00:34:11+5:302019-02-02T00:34:36+5:30
वाघनदीच्या पात्रातून हजारो ब्रास रेती चोरीला गेली. आमगाव येथील तहसीलदार व त्यांची चमू या रेती चोरीकडे सपशेल दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शंभूटोला येथील गावकऱ्यांनी केला होता. यासंदर्भात वृत्त प्रकाशित झाल्यानंतर तहसीलदारांनी वरिष्ठांना दाखविण्यासाठी थातूर-मातूर कारवाई केली.

महसूल विभाग शंभूटोला घाटावरील माफियांवर मेहरबान
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : वाघनदीच्या पात्रातून हजारो ब्रास रेती चोरीला गेली. आमगाव येथील तहसीलदार व त्यांची चमू या रेती चोरीकडे सपशेल दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शंभूटोला येथील गावकऱ्यांनी केला होता. यासंदर्भात वृत्त प्रकाशित झाल्यानंतर तहसीलदारांनी वरिष्ठांना दाखविण्यासाठी थातूर-मातूर कारवाई केली. परंतु ही कारवाई शंभूटोला घाटावर करण्यात आली नसून बाम्हणी घाटावर करण्यात आली.
न्यायालयाने घाट लिलाव करण्याची परवानगी न दिल्यामुळे जिल्ह्यातील एकही घाट लिलाव झाले नाही. मात्र रेतीची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे. आमगाव तालुका वगळता सातही तालुक्यात रेती चोरी संदर्भात कारवाई होत असल्याची जोरदार चर्चा आहे. परंतु मागील दोन वर्ष रेती चोरांवर अंकुश लावणारा आमगावचा महसूल विभाग यंदा रेती माफीयांवर मेहरबानच आहे. शंभूटोला येथील तरूणांनी रेती माफीयांच्या विरोधात एल्गार पुकारून यासंदर्भात तहसीलदाराकडे तक्रार केली.परंतु तहसीलदारांनी कारवाई न केल्यामुळे तरूण माध्यमांकडे गेले.
माध्यामांनी बातम्या प्रकाशित केल्यानंतर जिल्हा प्रशासनाला कारवाई दाखविण्यासाठी ३१ जानेवारीला आमगाव तालुक्याच्या बाम्हणी घाटावर रेती वाहून नेतांना दोन ट्रॅक्टर पकडण्यात आले.ज्यांचे महसूल विभागाशी देणे-घेणे नाही. अश्या रेती वाहून नेणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. परंतु ज्या रेती माफीयांसोबत महसूल विभागाचा ताळमेळ आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. शंभूटोला घाटाची विदारक स्थिती माध्यमांनी दाखवूनही त्या घाटातून रेती चोरी सुरूच आहे. फक्त त्या रेती माफीयांनी रेती वाहून नेण्याचा मार्ग बदलविला आहे.
उपसा झालेल्या रेतीची मोजणी करा
शंभूटोला घाटातून ५०० ते १००० ब्रास रेतीचा अवैध उपसा करण्यात आल्याचा आरोप शंभूटोला येथील तरूण करीत आहेत. परंतु या घाटावर रेती माफीयांवर कारवाई करण्याचे धाडस महसूल विभागाचे तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार यांनी दाखविले नाही. शंभूटोला येथून चोरी करण्यात आलेल्या रेतीचा झालेल्या उपसाचे मोजमाप करून तेवढा महसूल संबधीत अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून वसूल करावा अशी मागणी होत आहे.