गोंदियावासीयांना भरली थंडीची हुडहुडी; कमाल २१.७ तर किमान १७.६ अंश तापमान

By कपिल केकत | Published: December 7, 2023 07:33 PM2023-12-07T19:33:26+5:302023-12-07T19:34:27+5:30

विदर्भात पहिल्या क्रमांकावर

residents of gondia are covered in cold | गोंदियावासीयांना भरली थंडीची हुडहुडी; कमाल २१.७ तर किमान १७.६ अंश तापमान

गोंदियावासीयांना भरली थंडीची हुडहुडी; कमाल २१.७ तर किमान १७.६ अंश तापमान

कपिल केकत, गोंदिया: अगोदरच हिवाळा त्यात अवकाळी पावसाने मागील तीन दिवसांपासून मुक्काम ठोकून ठेवल्यामुळे जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला असून गोंदियावासीयांना थंडीची हुडहुडी भरली आहे. विशेष म्हणजे, गुरुवारी (दि.७) जिल्ह्याचे कमाल तापमान २१.७ अंशावर आले होते व जिल्हा विदर्भात पहिल्या तर किमान तापमान १७.६ अंशावर होते व जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर होता. थंडीमुळे जिल्हावासीयांना सकाळपासूनच गरम कपडे व शेकोटीचा आधार घ्यावा लागला.

हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यानंतर २७ व २८ नोव्हेंबर रोजी अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले होते. एवढ्यावरच अवकाळीने जिल्ह्याला सोडले नसून परत सोमवारपासून (दि.४) अवकाळीने जिल्ह्यात हजेरी लावली आहे. यानंतर तापमानात चांगलीच घसरण झाली असून जणू शीत लहरच आली आहे. गुरुवारी (दि.७) जिल्ह्याचे कमाल तापमान २१.७ अंशावर आले होते व जिल्हा विदर्भात पहिल्या क्रमांकावर तर किमान तापमान १७.६ अंशावर आले होते व त्यानंतर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर होता. थंडीमुळे जिल्हावासीयांना सकाळपासूनच गरम कपडे व शेकोटीचा आधार घ्यावा लागला. या वातावरणाचा सर्वाधिक फटका मात्र लहान मुले व वयोवृद्धांना बसत आहे.

सोमवारपर्यंत पावसाचा अंदाज

सोमवारपासून सातत्याने बरसत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे पार नुकसान झाले असतानाच ढवळलेल्या वातावरणामुळे जनजीवनही विस्कळीत झाले आहे. अशातच येत्या सोमवारपर्यंत (दि.११) हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. ऐन हिवाळ्यात पाऊस बरसत असल्याने वातावरणातील बदलाने थंडीचा जोर वाढला असून स्वेटर घालावे की रेनकोट, अशी पंचाईत जिल्हावासीयांची होत आहे.

Web Title: residents of gondia are covered in cold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.