कोरोनाच्या संकटातही पोलीस होण्यासाठी नियमित तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 05:01 IST2020-06-16T05:00:00+5:302020-06-16T05:01:20+5:30
कोरोना महासंकटाने सर्वच जण हवालदिल झाले आहेत. अनेकांचे रोजगार गेले आहेत. तर काहींच्या हातांना काम नाही. अशा परिस्थितीत हातावर हात देऊन न बसता लाखनी तालुक्यातील पालांदूर येथील सुमारे ४० ते ५० तरुण दररोज पोलीस बनण्याच्या महत्वकांक्षेने ध्येयवेडे होत सराव करीत आहेत. तरुणांच्या हौसेचे बळ बघता पोलीस सुद्धा त्यांना विविध टिप्स देऊन मार्गदर्शन करीत आहेत.

कोरोनाच्या संकटातही पोलीस होण्यासाठी नियमित तयारी
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : इच्छा तिथे मार्ग म्हणतात, ते खोटे नाही. उचित ध्येय गाठण्यासाठी परिश्रमाशिवाय पर्याय नाही. एकदा अपेक्षित ध्येय निश्चित केले की, मग त्यासाठी सुरु होते धडपड. असेच काही तरुण पोलीस होण्यासाठी कोरोनाच्या महासंकटातही नियमित तयारी करीत आहेत. पालांदुरच्या पोलीस मैदानावर दररोज ४० ते ५० तरुण शारीरिक कवायती करताना दिसत आहेत. त्यांना पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी मार्गदर्शन करीत आहेत.
कोरोना महासंकटाने सर्वच जण हवालदिल झाले आहेत. अनेकांचे रोजगार गेले आहेत. तर काहींच्या हातांना काम नाही. अशा परिस्थितीत हातावर हात देऊन न बसता लाखनी तालुक्यातील पालांदूर येथील सुमारे ४० ते ५० तरुण दररोज पोलीस बनण्याच्या महत्वकांक्षेने ध्येयवेडे होत सराव करीत आहेत. तरुणांच्या हौसेचे बळ बघता पोलीस सुद्धा त्यांना विविध टिप्स देऊन मार्गदर्शन करीत आहेत.
पालांदूर परिसरात मोठे मैदान नसल्याने पोलीस ठाण्याच्या आवारातच ही तरुणाई विविध शारीरिक कसरती करताना दिसतात. उन, वारा, पाऊस काहीही असले तरी त्यांच्या सरावात खंड पडत नाही. मी पोलीस बनणारच, या ध्येयाने प्रेरीत होऊन ते येथे अंगमेहनत करताना दिसतात.
पालांदूर परिसरात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. अनेकांनी शेती व त्याशी निगडीत व्यवसाय स्वीकारले आहे. परंतु काहींना शासकीय नोकरीतच तेही पोलीस दलात सहभागी व्हायचे आहे. त्यासाठी त्यांची कठोर परिश्रम करण्याची तयारी असून त्यासाठी ही मंडळी धावपळ करताना दिसत आहे.
यापूर्वीचे ठाणेदार अंबादास सुनगार, पालांदुरचे बीट जमादार कचरू शेंडे यांच्या परिश्रमातून आणि लोकसहभागातून येथे सुलभ क्रीडांगण तयार करण्यात आले. याच क्रीडांगणालगत दुमजली अंबर इमारत उभारुन त्यात जीम अर्थात व्यायमशाळा सुरु करण्यात आली.
ग्रामीण भागातील मुले कुठेही कमी पडू नये या उदात्त हेतूने पोलीस विभागाने तरुणांसाठी विविध पर्याय खुले करून दिले आहेत. त्यात उपयुक्त पुस्तकांचाही समावेश आहे. गत तीन वर्षात १० ते १२ मुले पोलीस भरतीत सहभागी झाले आहेत हे विशेष.
जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक युवराज खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात ही तरुणाई आज एका ध्येयाने प्रेरीत होऊन पोलीस होण्याच्या जिद्दीने प्रयत्न करीत आहेत.
तर कवलेवाडा येथील अभ्यास केंद्रातही पुस्तक उपलब्ध होत आहेत. नव्याने रूजू झालेले ठाणेदार दीपक पाटीलही या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.