कंत्राटी डॉक्टरांच्या मानधनात कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 05:00 IST2020-05-12T05:00:00+5:302020-05-12T05:00:44+5:30

संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी डॉक्टर वैद्यकीय अधिकारी म्हणून रूग्णांची सेवा करीत आहेत. शासकीय महाविद्यालयातून एमबीबीएस केलेल्या डॉक्टरांना वैद्यकीय सेवा देण्याचे नियम आहेत.

Reduction in contract doctor's honorarium | कंत्राटी डॉक्टरांच्या मानधनात कपात

कंत्राटी डॉक्टरांच्या मानधनात कपात

ठळक मुद्देशासनाचा अजब निर्णय : नाराज डॉक्टरांची राजीनाम्याची तयारी, कोरोना संक्रमण

लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव बघता आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्स, सफाई कामगार रात्रंदिवस आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावीत आहेत. अनेक आरोग्य केंद्रात पीपीई किट (संरक्षक साहित्य) उपलब्ध नसतानाही आरोग्य विभातील कर्मचारी सेवा देत आहेत. त्यांचा या कार्याबद्दल पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांसह सर्वच स्तरातून कौतुक केले जात असतानाच कंत्राटी डॉक्टरांच्या मानधनात कपात करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे अनेक डॉक्टर नाराज झाले असून काही डॉक्टरांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी डॉक्टर वैद्यकीय अधिकारी म्हणून रूग्णांची सेवा करीत आहेत. शासकीय महाविद्यालयातून एमबीबीएस केलेल्या डॉक्टरांना वैद्यकीय सेवा देण्याचे नियम आहेत. तसेच नियम नर्सेसला लागू आहेत. यालाच अनुसरून डॉक्टर व परिचारिका रात्रंदिवस कर्तव्य बजावीत आहेत. शासनाने २० एप्रिल रोजी घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील सर्वच कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना कंत्राटी सेवा अंतर्गत मानधन लागू करण्यात आले आहे.
कंत्राटी अधिकारी हे राजपत्रित अधिकारी श्रेणीत मोडणारे असून त्यांना सध्याच्या स्थितीत सेवार्थ प्रणाली अंतर्गत वेतन दिले जात आहे. त्यामुळे सातव्या वेतन आयोगाच्या नियमानुसार सर्व भत्ते मिळतात.
सेवार्थ प्रणाली अंतर्गत सर्व भत्ते मिळून या कंत्राटी डॉक्टरांचे वेतन ७५ ते ८० हजार रूपयांपर्यंत जाते. परंतु आता नवीन नियमानुसार कंत्राटी सेवा अंतर्गत मानधन दिले जाणार असून त्यांतर्गत ५५ हजार रूपये मानधन मिळणार आहे. हे मानधन कमी असल्याने डॉक्टरांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. कंत्राटी डॉक्टरांच्या मानधन कपातीचा निर्णय मागे घ्यावा असे या डॉक्टरांनी आरोग्य विभागाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. डॉक्टरांच्या खांद्यावर एका हाताने बंदूक ठेऊन कोरोनाशी लढताना सरकारने दुसऱ्या हाताने त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. काम नाही केले तर निलंबनाची धमकी. चांगले काम करायला पुढे आले तर पगारात कपात हा निर्णय चुकीचा असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Web Title: Reduction in contract doctor's honorarium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :doctorडॉक्टर