लाल डोक्याचा भारीट, दलदली भोवत्या आढळला
By Admin | Updated: March 17, 2016 02:43 IST2016-03-17T02:43:11+5:302016-03-17T02:43:11+5:30
देवळी परिसरात लाल डोक्याचा भारीट आणि दलदली भोवत्या हे दोन पक्षी पहिल्यांदाच आढळले.

लाल डोक्याचा भारीट, दलदली भोवत्या आढळला
पक्षीमित्रांमध्ये आनंद : बहार नेचर फाऊंडेशनच्या प्रतिनिधींनी केली नोंद
वर्धा : देवळी परिसरात लाल डोक्याचा भारीट आणि दलदली भोवत्या हे दोन पक्षी पहिल्यांदाच आढळले. स्थानिक बहार नेचर फाऊंडेशनने या दोन्ही पक्षांची नोंद घेतल्याने पक्षिमित्रांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
लाल डोक्याच्या भारीट पक्ष्याला मराठीत रक्तीशीर्ष भरीट तर इंग्रजीमध्ये ‘रेड हेडेड बटींग’, असे म्हंटले जाते. हा पक्षी प्रामुख्याने बलुचिस्तानमध्ये आढळतो. हिवाळ्यात या पक्ष्यांचे थवे भारतात येतात. चिमणीपेक्षा मोठ्या आकाराच्या पक्ष्याचा डोळा, गळा हा लाल रंगाचा असतो. पोटाच्या खालचा भाग पिवळ्या रंगाचा असून पाहताक्षणी नागरिकांचे लक्ष वेधून घेतो. हा पक्षी केवळ झुडपी जंगलात आढळतो. मार्च महिना संपल्यानंतर या पक्ष्यांचा थवा मायदेशी रवाना होतो.
दलदली भोवत्या पक्ष्याला पाणघार, असे म्हणतात. ‘एक्सिपिट्रीडी’ या कुलात येणाऱ्या या पक्ष्यांचे शास्त्रीय नाव ‘सर्कल ऐरूजिनस’ असे आहे. तपकिरी रंगामुळे गावखेड्यात घारपक्षी हेच नाव प्रचलित आहे. हिवाळ्यात पाहुणे म्हणून आलेल्या या पक्ष्याचे दर्शन दुर्मिळ आहे. दलदली भोवत्याची नोंद वर्धा शहरानजिक दिग्रस तलावावर करण्यात आली, असे बहार नेचर फाऊंडेशनचे सुभाष मुडे, अविनाश भोळे, विनोद साळवे, घनश्याम माहुरे, बुद्धदास मिरगे, राहुल वकारे, सारंग फत्तेपुरिया, पवन दरणे, सारिका मून, चित्रा इंगोले, दर्शन दुधाणे, निखिल खोडे, श्रेयस ठाणेकर, जयंत महाजन, नरेश वाघ आदींनी दिली.(कार्यालय प्रतिनिधी)