लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : तालुक्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून संततधार पाऊस बरसत असून चांगलाच कहर केला आहे. संततधार पावसामुळे नाले दुधडी भरून वाहू लागले असून काही रस्त्यांवरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद पडली आहे. मंगळवारी (दि.१९) तालुक्यात ८३ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे.
तालुक्यात पावसाने चांगलाच कहर केला असून मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी पुलावरून पाणी वाहू लागले आहे. जिल्ह्यातील एकीकडे जेथे पाऊस नसतानाच तालुक्यात मात्र पावसाने जनजीवन विस्कळीत करून सोडले आहे. मंगळवारी तालुक्यात ८३ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. यामध्ये तालुक्यातील सहा महसूल राजस्व मंडळात सोमवारी चांगलाच पाऊस पडला. महागाव मंडळात १४९.५ मिमी, केशोरी मंडळात १४९.५ तर तर गोठणगाव महसूल मंडळातही १४९.५ मिमी पाऊस बरसला आहे. एकंदर अवघ्या तालुक्यात अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली असतानाच या तीन महसूल मंडळातही अतिवृष्टी झाली आहे.
यानंतर तालुक्यात मंगळवारपर्यंत एकूण १०४१.७ मिमी पाऊस बरसल्याची नोंद घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत जिल्ह्यात कोणत्याच तालुक्यात एवढा पाऊस बरसलेला नाही. संततधार पावसामुळे तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाली आहे.
केशोरी ते वडसा बससेवा बंदकेशोरी ते वडसा मार्गावरील पुलावरून पाणी वाहू लागल्याने संपूर्ण मार्ग बंद झाला आहे. इटियाडोह प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने या मार्गावरील नाल्यामध्ये पाण्याचा संचय वाढला. सोमवारपासून पुलावरून पाणी वाहू लागले असून मार्गावरील खोडदा पुलावर पाणी चढल्याने केशरी वडसा बससेवा बंद झाली आहे. याशिवाय, शिरोली ते इटखेडा, इडदा ते राजुरी, इडदा के वडेगाव, केशोरी ते वडसा मार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद झाली आहे.