म्हैसुली वासीयांच्या समस्यांचे त्वरित निराकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:34 IST2021-09-17T04:34:28+5:302021-09-17T04:34:28+5:30
देवरी : तालुक्यातील म्हैसुली हे गाव आदिवासी अतिदुर्गम, डोंगराळ, नक्षलग्रस्त व शंभर टक्के आदिवासी गाव आहे. गावात आरोग्य, शिक्षण, ...

म्हैसुली वासीयांच्या समस्यांचे त्वरित निराकरण करा
देवरी : तालुक्यातील म्हैसुली हे गाव आदिवासी अतिदुर्गम, डोंगराळ, नक्षलग्रस्त व शंभर टक्के आदिवासी गाव आहे. गावात आरोग्य, शिक्षण, दळणवळण व संपर्क माध्यमाच्या अभावामुळे स्वातंत्राच्या ७५ व्या वर्षानंतरसुद्धा येथील नागरिक विकासाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित आहेत. म्हैसुली गावाकडे शासन व प्रशासन लक्ष न देता मुद्दाम दुर्लक्ष करीत आहे. तरी आपण म्हैसुलीवासीयांच्या समस्यांचे त्वरित निराकरण करावे, अशा आशयाचे निवदेन गुरुवार म्हैसुलीचे उपसरपंच ईश्वर कोल्हारे यांच्या नेतृत्वात गावातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना भेटून दिले.
निवेदनात म्हैसुली गावात ‘गोटूल’ सारख्या संस्कार केंद्राच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन देणे, महाजनटोला तलावाच्या मोठ्या कालव्याचे अपूर्ण काम त्वरित पूर्ण करण्याचे संबंधित विभागास निर्देश देणे, धान विक्रीकरिता मुरदोली संस्थेऐवजी घोनाडी संस्थेशी संलग्न करावे, गावातील वीज वितरणाची डीपी सध्या बोंडे येथे असून त्याऐवजी म्हैसुली फाट्यावर डीपी देणे, वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत संबंधित विभागास निर्देश देणे, गावात मोबाईल टॉवरची सोय उपलब्ध करुन देणे, दळणवळणाकरिता बस सेवा तत्काळ सुरु करून देणे, वनहक्क जमीन वाटप प्रकरणात आमच्या विस्तारासाठी १२०० हेक्टर जमीन उपलब्ध करुन देणे आणि रोजगार हमी योजनेतर्फे वनविभागाकडून या गावात वर्ष २०१७-१८ मध्ये पूर्ण झालेल्या कामाच्या मोबदल्याची रक्कम १० लक्ष रुपये येथील मजुरांना अद्याप मिळालेली नाही ती रक्कम त्वरित मिळवून देणे आदी मागण्यांचा समावेश आहे. निवेदन देताना महाराष्ट्र आदिवासी सेवक राजाराम सलामे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शामराव काटेंगे, सामाजिक कार्यकर्ता मानिक कोरेटी, विजय सलामरे, पोलीस पाटील राजेश सलामे आदी उपस्थित होते.