९० जणांना ठेवले शासकीय अलगिकरण कक्षात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 05:00 IST2020-04-11T05:00:00+5:302020-04-11T05:00:02+5:30
२७ मार्च जिल्ह्यात पहिला कोरोना बाधीत रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा व आरोग्य प्रशासनाने युध्द पातळीवर उपाययोजना सुरू केल्या. त्यामुळेच यानंतर जिल्ह्यात एकही नवीन कोरोना बाधीत रुग्ण आढळला नाही. विशेष म्हणजे दिल्ली निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची बाब उघडकीस आल्यानंतर देशभरात हायअर्लट देण्यात आला होता.

९० जणांना ठेवले शासकीय अलगिकरण कक्षात
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दिल्ली निजामुद्दीन येथील एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांना कोरोनाचा संसर्गाची लागण झाली असल्याचे त्यांच्या आरोग्य तपासणीनंतर स्पष्ट झाले आहे. याच पार्श्वभूमीवर या कार्यक्रमा दरम्यान दिल्ली निजामुद्दीन प्रवासाचा संदर्भ असलेल्या जिल्ह्यातील प्रवाशांचा शोध जिल्हा प्रशासनाकडून घेतला जात आहे. आतापर्यंत एकूण अशा एकूण ९० जणांचा शोध घेवून त्यांना गोंदिया येथील शासकीय अलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
२७ मार्च जिल्ह्यात पहिला कोरोना बाधीत रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा व आरोग्य प्रशासनाने युध्द पातळीवर उपाययोजना सुरू केल्या. त्यामुळेच यानंतर जिल्ह्यात एकही नवीन कोरोना बाधीत रुग्ण आढळला नाही. विशेष म्हणजे दिल्ली निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची बाब उघडकीस आल्यानंतर देशभरात हायअर्लट देण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सुध्दा या कालावधीत दिल्ली निजामुद्दीन प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या जिल्ह्यातील प्रवाशांचा शोध घेवून त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून शासकीय विलगीकरण कक्षात आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखाली ठेवले जात आहे.
जिल्ह्यातील ३ शासकीय अलगीकरण व विलगीकरण केंद्रात ९० व्यक्ती सध्या उपचार घेत आहेत. यात गोंदिया आयुर्वेदिक कॉलेज ७८, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील विलगीकरण केंद्र २ व लहीटोला १० अशा एकूण ९० व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली.
क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतरही नजर
विदेशातून प्रवास करून २५१ व्यक्ती जिल्ह्यात आल्यात.त्यांचा व त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वच व्यक्तींचा १४ दिवसांचा वास्तव्याच्या ठिकाणी अलगिकरणात राहण्याचा कालावधी संपलेला आहे. कालावधी जरी संपला असला तरी त्यांनी स्वत:हून अलगीकरणातच राहावे. जिल्हा प्रशासनाची त्यांच्यावर देखरेख राहणार असून आरोग्य विभाग सुद्धा त्यांच्या आरोग्याची काळजी घेत आहे.
२० नमुन्यांचा अहवाल अप्राप्त
जिल्ह्यातील एकूण १२२ स्वॅब नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यापैकी १०२ नमुन्यांचा अहवाल १० एप्रिलपर्यंत प्राप्त झाला आहे. त्यामध्ये १०१ नमुने निगेटिव्ह आलेले आहेत. तर १ नमुना यापूर्वीच पॉझिटिव्ह आढळून आला आहे. २० नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. तर शुक्रवारी पुन्हा एक स्वॅब नमुना तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविला आहे.