व्यावसायिक आणि कार्यकर्त्यांची चांदी

By Admin | Updated: October 13, 2014 23:23 IST2014-10-13T23:23:15+5:302014-10-13T23:23:15+5:30

निवडणुका आल्या की अनेक ‘व्यावसायिक’ कार्यकर्त्यांची चांगलीच चांदी होते. त्यांचे एकूण कार्यचित्रच पालटून जाते. यावर्षी पाऊस कमी झाल्याने शेतकरी व सर्वसामान्यांवर दुष्काळाचे सावट असले

Professional and workers' silver | व्यावसायिक आणि कार्यकर्त्यांची चांदी

व्यावसायिक आणि कार्यकर्त्यांची चांदी

राधेश्याम भेंडारकर -अर्जुनी/मोरगाव
निवडणुका आल्या की अनेक ‘व्यावसायिक’ कार्यकर्त्यांची चांगलीच चांदी होते. त्यांचे एकूण कार्यचित्रच पालटून जाते. यावर्षी पाऊस कमी झाल्याने शेतकरी व सर्वसामान्यांवर दुष्काळाचे सावट असले तरी निवडणुकांमध्ये पैशाचा पाऊस पडायला लागला आहे. त्यामुळे तूर्तास का होईना सर्वांना दिलासा मिळाला आहे. या लाभामुळे व्यावसायिक आणि कायकर्त्यांमध्ये सध्या आनंदी-आनंद दिसत आहे.
निवडणुका म्हटल्या की प्रचार आलाच. प्रचारासाठी सभा, सभेत मोठ्या दिग्गजांची वर्णी लागते. प्रचारसभा यशस्वी करण्यासाठी कार्यकर्ते कंबर कसून काम करतात. मंडप, डेकोरेशन, हारतुरे, माईक व्यवस्था, प्रचार गाड्या, थंड बिसलरी बाटल्या, चहा-नास्ता, सभास्थळी टोप्या, झेंड्या, होर्डींग्स या सर्व साधनांची जमवाजमव करावी लागते. प्रचार सभेत मंचावर आपल्या उमेदवारांचे पाठबळ किती आहे, हे दाखविण्यासाठी, स्वागतासाठी पार्टीतर्फेच हारतुऱ्यांची व्यवस्था असते. स्वागत करणाऱ्या कार्यकर्त्यांची रिघ बघताना कदाचित उमेदवारांच्या मनात प्रश्न निर्माण होत असावे.
‘आमचेच हार-आमचेच तुरे
स्वागत करण्याएवढे कार्यकर्ते
कुठून आलेत बरे,
यातील किती खोटे किती खरे!’
या सर्व धामधुमीमध्ये एरवी एक कटींग चहाच्या खर्चासाठी हात मागे करणारा उमेदवार जणू दिलदारच बनतो. वारेमाप पैशाची उधळण, हार तुऱ्यांमुळे फूल विक्रेत्यांची चांदीच चांदी असते. प्रचारासाठी महिन्यापूर्वीपासून मोटारगाड्यांची बुकींग करावी लागते. यामुळे अन्य लोकांची अनेकदा गाड्यांच्या कमतरतेने गोची होते.
निवडणुकीचा प्रचार करताना कार्यकर्ते तन, मन (धन सोडून) कामाला लागतात. धन उमेदवारालाच लावावे लागते. उन्हातान्हात प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांनाही पोट असते. त्यांच्या पोटासाठी जेवण, चहा, पान, शितपेय यांची व्यवस्था उमेदवार करतोच. भोजनालय, शितपेय, विक्रेते, चहापान टपरीवाले, मंडप डेकोरेशन, पक्षाचे प्रचार साहित्य विक्रेते, मुद्रणालये, पेट्रोल, डिजेल पंप यांना सध्या सुगीचे दिवस असल्याने प्रत्येकाची चांदी झाली आहे. कार्यकर्त्यांना जसे अन्नपाणी पाहिजे तसेच प्रचारातील मोटार गाड्यांना पेट्रोल डिझेलची गरज भासते. अर्थात पेट्रोल पंप मालकांची चांदी, गाडी चालविणाऱ्या ड्रायव्हरची व गाडी मालकाची चांदी, प्रचार करताना कार्यकर्त्यांची कमी असल्यास गाडीत कार्यकर्ते म्हणून दाखविण्यासाठी वापर होणाऱ्या बेरोजगार युवकांची चांदी, प्रचार सभेत गर्दी दाखविण्यासाठी असलेल्या महिलांची चांदी, रोजीने कार्यकर्त्यांची जमवाजमव करणाऱ्या ठेकेदारांची चांदी, असे चित्र गेली १५ दिवस सर्वत्र दिसत होते. त्यामुळे पूर्वीचे निवडणुकीचीचे चित्र मागे पडून त्यात बदल झाल्यास ती अशी राहील.
‘आई-बाई अक्का, कुठेही मारा शिक्का, १०० रुपयांचा हिशेब पक्का’
लाडक्या उमेदवाराचा प्रचार करून रात्री दमल्या-भागलेल्या जीवांना जेवणापूर्वी पौष्टिक सोमरसाचा ‘रिचार्ज’ करावाचा लागतो. कारण दुसऱ्या दिवशी पुन्हा जोर लागतो. सरळ सोमरसाची या काळात मागणी करण्यासाठी सांकेतिक भाषा वापरली जाते. मी छोटा रिचार्ज मारला, मी टॉपअप मारला तर काही फुल्ल रिचार्ज केला, असे मोबाईलच्या भाषेत बोलतात. अर्थात मद्यविक्री व्यावसायिकांचीही चांदी झाली.
प्रचाराची माध्यमे बदलून त्यांची जागा आता सोशल मीडियाने घेतली. यामुळे मोबाईल कंपन्यांची चांदी. मतदार, कार्यकर्ते, बेरोजगार युवक, वाहन मालक, भोजनालय, शितपेय विक्रेते, पानठेले, चहा विक्रेते, पेट्रोल पंपधारक, मुद्रणालये, मंडप डेकोरेशनवाले, पक्षाचे साहित्य विक्रेते गेल्या १५ दिवसात एकच धून गाताना दिसत होते, आया सावन झुमके..

Web Title: Professional and workers' silver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.