अरूंद फूट ओव्हरब्रिजमुळे वाढणार समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 21:02 IST2017-10-09T21:01:49+5:302017-10-09T21:02:30+5:30
मुंबईच्या एलफिन्स्टन रेल्वे स्थानकावर बनलेल्या फूट ओव्हरब्रिजवर एकच गोंधळ उडाला होता. या घटनेत अनेकांचे जीव गेले.

अरूंद फूट ओव्हरब्रिजमुळे वाढणार समस्या
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मुंबईच्या एलफिन्स्टन रेल्वे स्थानकावर बनलेल्या फूट ओव्हरब्रिजवर एकच गोंधळ उडाला होता. या घटनेत अनेकांचे जीव गेले. यानंतर रेल्वेच्या फूट ओव्हरब्रिजच्या उपयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. जवळपास सर्वच फूट ओव्हरबिजची तपासणी करण्यात आली. यात अरूंद फूट ओव्हरब्रिजमुळे समस्या वाढण्याचे चिन्ह दिसून आले.
गोंदिया रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म-५ व ६ वर अत्यंत अरूंद फूट ओव्हरब्रिज (रॅम्प) आहे. केवळ दोन-तीन वर्षांपूर्वीच सदर अरूंद रॅम्प तयार करण्यात आले. हा रॅम्पसुद्धा धोकादायक ठरू शकतो, असे म्हटले जात आहे. या प्लॅटफॉर्मवरून विदर्भ एक्स्प्रेस व महाराष्टÑ एक्स्प्रेस सुटतात व येतात. याशिवाय बालाघाटच्या दिशेने ये-जा करणाºया गाड्यांमधून दरदिवसी हजारोंच्या संख्येने प्रवाशी ये-जा करतात. भविष्यात बालाघाटच्या पुढे रेल्वे मार्गाला देशाच्या उत्तर भागाशी जोडण्याची योजना आहे. अशात अतिरिक्त भार या दोन्ही प्लॅटफॉर्मवर दिला जावू शकतो. असे झाले तर सदर फूट ओव्हरब्रिज आवश्यकतेपेक्षा अधिक प्रवाशांचा भार सहन करू शकणार नाही, असे मानले जात आहे.
अशा स्थितीत या अरूंद फूट ओव्हरब्रिजच्या जागेवर नवीन फूट ओव्हरब्रिजची गरज दर्शविली जात आहे. प्लॅटफॉर्म-२ वरसुद्धा सध्या एका नवीन फूट ओव्हरब्रिजचे काम सुरू आहे. हा फूट ओव्हरब्रिजसुद्धा अत्यंत अरूंद बनविण्यात येत आहे.
मुंबईमध्ये झालेल्या घटनेचे मुख्य कारण अरूंद फूट ओव्हरब्रिज आहे. रेल्वे प्रशासनाने अशा दुर्घटना टाळण्याच्या दिशेने पाऊल उचलावे, अशी प्रवाशांची मागणी आहे. परंतु रेल्वे प्रशासन नवीन अरूंद पूल तयार करण्यातच गुंतले आहे.
एस्कलेटर बनेल तर पूल हटेल
गोंदिया रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक एच.ए. चौधरी यांच्याशी विचारपूस केल्यावर त्यांनी स्वीकार केले की, प्लॅटफॉर्म-५ व ६ वरील फूट ओव्हरब्रिज अत्यंत अरूंद आहे. रेल्वे विभागाचे काय नियोजन आहे, याबाबत काही सांगण्यास त्यांनी असमर्थता व्यक्त केली. ते म्हणाले की, जवळ भविष्यात सदर प्लॅटफॉर्मवर एस्कलेटर लावण्याची गरज पडू शकते. परंतु यासाठी आणखी वेळ आहे. त्यावेळी अरूंद पुलाऐवजी मोठे मोठे पूल तयार करावे लागेल, असे त्यांनी सांगितले.