तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनास आळा घालण्यासाठी ‘सुपर आर्मी’
By Admin | Updated: August 31, 2014 23:58 IST2014-08-31T23:58:36+5:302014-08-31T23:58:36+5:30
तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनावर बंदी घालण्यासाठी शासनाने कितीही प्रयत्न केले तरी ते प्रयत्न १०० टक्के यशस्वी ठरत नाही. अशा पदार्थांची लपूनछपून विक्री सुरूच असते. याशिवाय या पदार्थांच्या गेल्यावर

तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनास आळा घालण्यासाठी ‘सुपर आर्मी’
विजेंद्र मेश्राम - खातिया
तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनावर बंदी घालण्यासाठी शासनाने कितीही प्रयत्न केले तरी ते प्रयत्न १०० टक्के यशस्वी ठरत नाही. अशा पदार्थांची लपूनछपून विक्री सुरूच असते. याशिवाय या पदार्थांच्या गेल्यावर त्यांचे सेवन एकदम बंद करणे शक्य नसते. कोणतेही परिसर असो तंबाखूजन्य पदार्थ खाणारे आढळतातच. ही बाब लक्षात घेवून अशा पदार्थांच्या सेवनावर आळा घालण्यासाठी खातिया येथील कुवर तिलकसिंह जि.प. माध्यमिक शाळेत ‘सुपर आर्मी’ स्थापित करण्यात आली.
रावणवाडी केंद्रांतर्गत येणाऱ्या या शालेय परिसरात किंवा शाळेच्या अवतीभोवती कुणीही तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करताना आढळले तर शाळेची ही सुपर आर्मी त्या व्यक्तीचे पाय पकडून ते पदार्थ मागतील व कचऱ्याच्या कुंडीत जमा करतील.
शालेय परिसरात खर्रा, बीडी, सिगारेट आदी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करताना कुणी आढळले तर सुपर आर्मीचे सदस्य त्या व्यक्तीचा घेराव करतील. त्यानंतर त्याचे पाय पकडून त्या तंबाखूजन्य पदार्थाची मागणी करतील. जोपर्यंत तो इसम आपल्या पँट किंवा शर्टच्या खिशातून ते पदार्थ देणार नाही तोपर्यंत सुपर आर्मीचे सदस्य त्याचे पाय सोडणार नाही.
शाळेच्या वतीने सुपर आर्मीचे गठन करण्यात आले असून गावातील लोकांना वाईट सवयींपासून मुक्त करणे व कर्करोगासह होणाऱ्या इतर रोगांपासून त्यांना वाचविणे, हाच उद्देश्य यामागे आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनावर आळा घालण्यासाठी गावात जनजागृती घडवून आणण्यासाठी ही सुपर आर्मी प्रयत्न करणार आहे.
या सुपर आर्मी समितीच्या वर एक तंबाखू निर्मूलन समिती आहे. यात मुख्याध्यापक के.एच. रहांगडाले व शिक्षक एस.आर. ब्राह्मणकर आणि सदस्यांमध्ये सरपंच व पालक आहेत. तसेच सुपर आर्मीच्या चमूमध्ये दहा विद्यार्थी व दहा विद्यार्थिनींचा समावेश आहे.