प्रदूषणमुक्त दिवाळीवर गोंदियावासीयांचा भर!
By Admin | Updated: October 25, 2014 01:32 IST2014-10-25T01:32:15+5:302014-10-25T01:32:15+5:30
आरोग्यावर होणारा परिणाम तसेच वातावरणातील वाढते प्रदूषण बघता नागरिकांनी आता दिवाळीच्या ....

प्रदूषणमुक्त दिवाळीवर गोंदियावासीयांचा भर!
गोंदिया : आरोग्यावर होणारा परिणाम तसेच वातावरणातील वाढते प्रदूषण बघता नागरिकांनी आता दिवाळीच्या सणात देखील फटाक्यांचा वापर कमी केला आहे. याला महागाईंचाही फटका ही तेवढाच कारणीभूत असून यामुळेच नागरिकांचा फटाकेमुक्त दिवाळीवर भर दिसून आला.
फटाके फोडल्याशिवाय अनेकांची दिवाळीच साजरी होत नाही. मात्र महागाईच्या फटक्यापासून फटाके सुद्धा सुटले नसून सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होत आहेत. पूर्वी २०० ते ३०० रुपयात सर्व प्रकारचे फटाके येत होते. मात्र आता हजार रूपयांचे फटाके घेऊनही ते पुरेसे होत नाही. आजची शिकलेली व जागरूक पिढी आरोग्याबाबत अधिकच गंभीर आहे. फटाक्यांचा धूराचा आरोग्यावर होणारा परिणाम शिवाय वातावरणातील वाढते प्रदूषण अशांना भावणारे नसल्याने त्यांचा कल फटाकेमुक्त दिवाळीकडे दिसून येत आहे. दिवाळीत फटाक्यांचा वापर कमी करून रोशनाई, एकत्र परिवार तसेच नातेवाईक व आप्तेष्टांच्या भेटीगाठीचा आनंद लुटण्याकडे या पिढीचा कल दिसून येत आहे. एकंदर महागाई व फटाक्यांचे दुष्परिणाम या दोन्ही बाबींमुळे नागरिकांचा कल फटाकेमुक्त दिवाळीकडे वाढत चालल्याचे बघावयास मिळत आहे. परिणामी फटाका व्यवसायात होत असलेली उलाढाल देखील यंदा जाणवली नसल्याचे काही व्यवसायीकांनी बोलून दाखविले. याबाबत ‘लोकमत’ने कानोसा घेतला असता दिवाळी साजरी करताना सर्वसामान्य नागरिकांना बऱ्याच प्रमाणात महागाईची झळ सहन करावी लागल्याचे दिसून आले. यातूनच फटाक्यांची विक्री दरवर्षीच्या तुलनेत कमी झाल्याचे फटाके व्यावसायिकांनी सांगितले.
यंदा पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्यांचे पिक अजून दारी आलेले नाही. शासकीय धान खरेदीही सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही. त्यामुळे दिवाळीसारखा सण यंदा नागरिकांना उत्साहाने साजरा करता आला नाही. याचा परिणाम फटाके व्यायसायिकांवर होवून फटाक्यांची विक्री कमी झाल्याचे गोंदियातील फटाका व्यावसायिकांनी सांगितले. शहरी नागरिकही फटाक्यांचे वाढते दर पाहता ते खरेदी करताना हात आखडता घेताना दिसले. विशेष म्हणजे प्रदूषणाबाबत नागरिकांमध्ये जागृती येत असल्यानेही फटाके फोडून पैशाचा चुराडा कशाला करायचा? अशी प्रतिक्रिया काही सूज्ञ नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. शहरात सहा ते सात फटाके विक्रीचे ठोक व्यावसायिक आहे. याशिवाय जवळपास १०० किरकोळ विक्रेते आहेत. यंदा नागरिकांनी कमी आवाजाच्या व स्वस्त दराच्या फटाक्यांना पसंती दर्शवून ते खरेदी केले. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान न होता ध्वनी व वायू प्रदूषण टाळण्याची नागरिकांची भावना दृढ होत असल्याचे दिसून आले.
अनार, फुलझडी, चक्री, लुझबॉम्ब, टिकल्या, आगपेटी, फॅन्सी फटाके आदी अत्यंत कमी आवाजाचे फटाके यंदा अधिक प्रमाणात विक्री झाले. याशिवाय बाजारात सुतळी बाँब, लक्ष्मी बाँब, रॅकेट, एकापाठोपाठ सात ते ३० आवाज होणारे फटाके उपलब्ध होते. मात्र ते कमी प्रमाणात विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)