‘समाज भवना’त शिरले राजकारण

By Admin | Updated: January 24, 2015 01:17 IST2015-01-24T01:17:02+5:302015-01-24T01:17:02+5:30

शहराच्या मध्यवस्तीमधील बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या समोरील भागात समाजभवनाला (कॉम्युनिटी हॉल) परवानगी देण्यासाठी सुरू असलेल्या हालचालींना आता राजकीय रंग चढत आहे.

Politics in 'Samaj Bhavna' | ‘समाज भवना’त शिरले राजकारण

‘समाज भवना’त शिरले राजकारण

गोंदिया : शहराच्या मध्यवस्तीमधील बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या समोरील भागात समाजभवनाला (कॉम्युनिटी हॉल) परवानगी देण्यासाठी सुरू असलेल्या हालचालींना आता राजकीय रंग चढत आहे. काँग्रेस पक्षाने प्रतिष्ठेच्या केलेल्या या विषयात भाजप मात्र काँग्रेसचे मनसुबे कसे हाणून पाडता येईल यासाठी प्रयत्नशिल आहे. त्यामुळे हा परिसर ‘सायलेन्स झोन’ आहे का? हे ठरविणे जिल्हा प्रशासनाला कठीण झाले आहे. दुसरी वैद्यकीय क्षेत्रात मात्र हे समाजभवन गंगाबाई रुग्णालयाजवळ होऊ नये याबद्दल अशी प्रतिक्रिया उमटत आहे.
शहरातील सिव्हील लाईन परिसरात परिसरात असलेल्या बाई गंगाबाई सरकारी महिला रुग्णालयासमोरील भागात हनुमान मंदिराकडील रस्त्याच्या दुसऱ्या बाजुने पडिक क्वॉर्टर्सच्या जवळपास तीस हजार वर्गफूट जागेवर समाजभवन बनविण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. ही जागा सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. मात्र ती जागा नगर परिषदेला द्यावी आणि त्यावर समाजभवनाची उभारणी करावी यासाठी दोन वर्षांपासून काँग्रेसचे आमदार गोपालदास अग्रवाल प्रयत्नशील आहेत.
विशेष म्हणजे या समाजभवनाच्या बांधकामासाठी आधीच ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून त्यापैकी ३ कोटी रुपये बांधकाम विभागाकडे देण्यातही आल्याचे सांगितले जाते. ती जागा न.प.कडे हस्तांतरित करण्यात यावी, असा ठराव गोंदिया नगर परिषदेने सर्वसाधारण सभेत घेऊन त्यासंबंधीचा प्रस्तावसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी अद्याप त्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही.
दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्यापर्यंत हा विषय पोहोचविण्यात आला आहे. ही जागा सायलेन्स झोनमध्ये असताना तिथे नियमबाह्य पद्धतीने बनवू पाहात असणाऱ्या या सभागृहाचा प्रस्ताव रद्द करावा अशी गळ त्यांना घालण्यात आली आहे. त्यावर पालकमंत्र्यांनी हे सभागृह नियमात बसत नसेल तर तिथे होणार नाही, अशी ग्वाही संबंधितांना दिली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
ही जागा सायलेन्स झोन आहे का?
शासनाने २१ एप्रिल २००९ आणि ७ आॅगस्ट २००९ ला जारी केलेल्या शासन आदेशानुसार ध्वनीप्रदुषणाच्या नियमांमध्ये रुग्णालयापासून १०० मीटर अंतरापर्यंतचा परिसर ‘सायलेन्स झोन’ मानल्या गेला आहे. मात्र प्रस्तावित समाजभवनाची जागा रुग्णालयापासून आणि डॉक्टरांच्या प्रस्तावित क्वॉर्टर्सच्या जागेपासून ५० मीटरपेक्षाही कमी अंतरावर आहे. या ठिकाणी समाजभवन तयार झाल्यानंतर त्या भवनात विविध सार्वजनिक कार्यक्रम होतील. विवाह समारंभासारख्या कार्यक्रमामुळे बँड, डिजे सुद्धा तिथे वाजतील. त्यामुळे बाळंतपणासाठी या रुग्णालयात भरती असणाऱ्या रुग्णांना, त्यांच्या नवजात बाळांना प्रचंड त्रास सहन करावा लागणार आहे. यातून त्या बाळांना बहिरेपणा किंवा महिलांना रक्तदाबासारखा त्रासही होऊ शकतो, असे रुग्णालयातील डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Web Title: Politics in 'Samaj Bhavna'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.