सागवानाची तस्करी करणारा मिनीट्रक पकडला; देवरी पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 10:28 IST2019-06-28T10:20:51+5:302019-06-28T10:28:25+5:30

पोलिसांना पाहताच वनतस्करांनी काढला पळ

police seized one truck of teakwood in gondia | सागवानाची तस्करी करणारा मिनीट्रक पकडला; देवरी पोलिसांची कारवाई

सागवानाची तस्करी करणारा मिनीट्रक पकडला; देवरी पोलिसांची कारवाई

देवरी(गोंदिया): शेंडा परिसरात गस्तीवर असताना देवरी पोलिसांनी सागवान लाकडांची तस्करी करणाऱ्या चोरट्यांचा एक मिनी ट्रक पुतळीच्या जंगलात पकडला. ही घटना आज मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

देवरी पोलिसांचे एक पथक ठाणेदार कमलेश बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली शेंडा परिसरात गस्तीवर होते. दरम्यान, पुतळीच्या जंगलातून जात असताना रस्त्याच्या एका बाजूला प्रकाशझोत दिसल्याने पोलीस पथक सतर्क झाले. त्या जागेचा कानोसा घेत पोलीस पथक घटनास्थळाकडे येत असल्याचे पाहून वन तस्करांनी तिथून पळ काढला. मात्र, सागवानाचे सुमारे सहा लाकडे भरून असलेला मिनीट्रक (MH 35 K 5503) पोलिसांच्या हाती लागला. हा मिनीट्रक पोलिसांनी सडक अर्जूनी वनविभागाच्या स्वाधीन केला. त्यामुळे आता या प्रकरणात वनविभागाकडून काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

शेंडा आणि लगतच्या जंगलातून होणाऱ्या वनतस्करीवर वनविभागाचा वचक राहिला नसल्याने वनतस्करांचे चांगलेच फावत असल्याची चर्चा सडक अर्जूनी तालुक्यात आहे. वनविभागाच्या सुस्त कारभारामुळे जंगलांचे अस्तित्व धोक्यात आल्याचाही आरोप नागरिकांनी होत आहे. दरम्याने देवरी पोलिसांनी केलेल्या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. 
 

Web Title: police seized one truck of teakwood in gondia