पावसाच्या सुखद आगमनाने रोवणीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 05:00 IST2020-08-11T05:00:00+5:302020-08-11T05:00:40+5:30
जिल्ह्यात सर्वत्र सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडत असून अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांना पूर आलेला आहे. परंतु सालेकसा तालुक्यात मध्यम पाऊस पडला असून या तालुक्यातील धरण व तलाव अजूनही रिकामे किंवा अर्धेच भरलेले आहे. दरम्यान पडलेला पाऊस शेतीच्या कामासाठी फार मोलाचा ठरला असून सर्वत्र खोळंबलेल्या रोवण्या सुरु झाल्या आहेत.

पावसाच्या सुखद आगमनाने रोवणीला वेग
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : आठवडाभरापासून थोड्याफार प्रमाणात पडत असलेल्या पावसाने मागील दोन दिवसांत दमदार हजेरी लावल्याने तालुक्यात भात रोवणीच्या कामाला वेग आला आहे. दरम्यान कोरडवाहू शेतातील खोळंबलेल्या रोवण्या पूर्ण होण्याच्या आशा बळावल्या आहे. परंतु रोवणीची मुदत संपल्यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्ह्यात सर्वत्र सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडत असून अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांना पूर आलेला आहे. परंतु सालेकसा तालुक्यात मध्यम पाऊस पडला असून या तालुक्यातील धरण व तलाव अजूनही रिकामे किंवा अर्धेच भरलेले आहे. दरम्यान पडलेला पाऊस शेतीच्या कामासाठी फार मोलाचा ठरला असून सर्वत्र खोळंबलेल्या रोवण्या सुरु झाल्या आहेत. येत्या १ आठवड्यात जवळपास सर्वांच्या रोवण्या संपण्याच्या वाटेवर असतील. परंतु ८० टक्के नर्सरी मुदतबाह्य झाल्याने उत्पादनावर मोठा फटका बसेल. कारणी साधारणत: पेरणी नंतर १ महिन्याच्या आत नर्सरीची रोवणी केल्यास धानाच्या तणाचा चांगला विकास होतो वेळेवर रोवणी झाल्यास जास्तीत जास्त फुटवे येतात. त्यामुळे लोंब्याची संख्या वाढते आणि उत्पादनात मोठी वाढ होते.
मात्र यंदा पेरणीला २ महिने लोटल्यानंतर पाऊस आला. २ महिन्यांच्या वयाची नर्सरी उपडून पुन्हा रोवणी केल्यास ती विकसित होत नाही. तसेच अशा धानाच्या शेतीला विविध प्रकारच्या रोगांचा सुद्धा प्रादुर्भाव होतो आणि उत्पादनावर मोठा फटका बसतो. हीच परिस्थिती यंदा निर्माण झालेली आहे. सामान्यत: जून महिन्यात पेरणी नंतर जुलै महिन्यात रोवणी झाल्यास उत्तम असते. परंतु यंदा जुलै महिना कोरडा गेल्याने रोवणी होऊ शकली नाही. आता आॅगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस आला आणि शेतकरी रोवणीकरीत आहे. फटका बसत असला तरी आता समाधान मानावे लागेल.