नियोजन व प्रभावी अंमलबजावणीची गरज

By Admin | Updated: July 3, 2014 23:40 IST2014-07-03T23:40:12+5:302014-07-03T23:40:12+5:30

जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबविण्यात येतात. राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी प्राप्त होणाऱ्या निधीचा योग्यप्रकारे वापर होणे महत्वाचे आहे.

Planning and Effective Implementation Requirement | नियोजन व प्रभावी अंमलबजावणीची गरज

नियोजन व प्रभावी अंमलबजावणीची गरज

नाना पटोले यांचे प्रतिपादन : नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा
गोंदिया : जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबविण्यात येतात. राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी प्राप्त होणाऱ्या निधीचा योग्यप्रकारे वापर होणे महत्वाचे आहे. तसेच सर्वच स्तरातील गरजू नागरिकांना या योजनांचा लाभ होणे आवश्यक आहे. विविध योजनांचा लाभ सामान्य जनतेला व्हावा यासाठी योजनेची प्रभावी अंमलबजावणी बरोबरच त्याचे नियोजन करणेही महत्वाचे आहे. सबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत नियोजन करावे, असे निर्देश गोंदिया-भंडारा लोकसभा क्षेत्राचे खासदार नाना पटोले यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेण्यात आलेल्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान योजना, अतिरीक्त केंद्रीय सहाय्य बैठक आढावा आणि जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
खा. नाना पटोले पुढे म्हणाले की, जिल्ह्याच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनामध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील विविध समस्यांबाबत विकासात्मक नियोजन करताना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सामान्य नागरिकांना कसा होईल, याचा प्रामुख्याने विचार करणे महत्वाचे आहे.
विविध योजनांच्या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप झळके, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर, जिल्हा नियोजन अधिकारी बी.एस. घाटे, उपजिल्हाधिकारी (सामान्य) डी.एम. मनकवडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जनबंधू, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते, उपवनसरंक्षक एन.के. रामाराव, जि.प. चे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यू.एन. वाकोडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिश कळमकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गीरी उपस्थित होते.
खा. नाना पटोले यांनी सुरूवातीला राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान योजनेचा आढावा घेतला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिश कळमकर यांनी पॉवर पॉर्इंट प्रेझेटेंशनच्या माध्यमातून जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या अभियानाच्या अंमलबजावणीबाबत माहिती दिली. गोंदियासारख्या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागात सन २००५ पासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत मातामृत्यू व अर्भक मृत्यूदर कमी करणे, आरोग्य सेवेचा दर्जा सुधारणे, विविध आजारांवर प्रतिबंध व नियंत्रण मिळवणे, आयुष आरोग्य सेवेव्दारे रुग्णांना आजारमुक्त करणे तसेच आरोग्यविषयक जनजागृती करणे हे मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. ही योजना राबविण्यासाठी तयार असलेल्या यंत्रणेबाबत माहिती दिली. जननी शिशू सुरक्षा योजनेंतर्गत अर्भक मृत्यू व माता मृत्यूचे प्रमाण घटले असून ९९.४७ टक्के प्रसूती आरोग्य संस्थेत झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
कुपोषित बालकांना मिळणारी सुविधा, त्यांच्यावर करण्यात येणारे उपचार, आशा योजना, सिकलसेल आजारावर करण्यात येणारे मार्गदर्शन, आयुष उपचार पध्दती, मोबाईल मेडिकल युनिटची कार्यपध्दती तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाव्दारे १०८ टोल फ्री क्रमांकावर उपलब्ध असलेल्या अ‍ॅम्बुलन्सची सेवा याबाबत खा. पटोले यांनी माहिती घेतली. तसेच मृत्यूदरामध्ये वाढ झाल्याची कारणे आणि बालमृत्यू समस्या सोडविण्यासाठी सबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी निर्देश दिले. पीसीपीएनडीटी अंतर्गत गर्भलिंग निदानाबाबत तसेच त्याकरिता असलेले भरारी पथक, स्टींग आॅपरेशन, कॉन्सिलिंग या सर्व कार्यावर नाना पटोले यांनी समाधान व्यक्त केले. एनआरएचएम अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राबाबत पद भरती, नियुक्त असलेले अधिकारी व कर्मचारी याबाबतही त्यांनी विचारणा केली.
त्यानंतर अतिरीक्त केंद्रीय सहाय्य बैठक आढावा त्यांनी घेतला. या योजनेची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी बी.एस. घाटे यांनी पॉवर प्रेझेटेंशनच्या माध्यमातून दिली. या योजनेंतर्गत आर्थिक चालू वर्षात अपेक्षित निधी २ टप्यांमध्ये मिळणार असून जिल्ह्यातील विविध विकासात्मक ८० कामांपैकी ४१ कामे पूर्ण झाल्याची माहिती दिली. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते विकास कार्यक्रमांतर्गत रस्त्यांची ४० कामे पूर्ण झाल्याची माहिती कार्यकारी अभियंता जनबंधू यांनी दिली. यामध्ये रस्त्याचे मजबुतीकरण, डांबरीकरण, खडीकरण इत्यादी कामांचा समावेश आहे.
अतिरीक्त केंद्रीय सहाय्य योजनेतील वनविभागाचे पुनर्वसीत गाव सौंदड येथील पाणी पुरवठा योजना, विद्युतीकरण ही कामे पूर्ण झाली असून संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे बळकटीकरण, शाळेच्या व अंगणवाडी इमारतीच्या बांधकामाबाबत उपवनसरंक्षक रामाराव यांनी माहिती दिली.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते यांनी जिल्हा, स्त्री, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांचे बळकटीकरण, जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्रातील सुविधा याबाबत माहिती दिली. जिल्हा क्रीडा अधिकारी गीरी यांनी जिल्हा परिषद शाळा व आश्रमशाळा यांना पुरविण्यात आलेल्या क्रीडा साहित्यांची पूर्णपणे माहिती दिली.
त्यानंतर जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रण समिती आढावा बैठकीत प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, भूमिअभिलेखचे संगणकरीकरण, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित या विभागाच्या विविध विकासविषयक योजनांचा आढावा घेतला. ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, घरकुल बांधकामाबाबत सद्यस्थिती, निर्मल भारत योजना, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, स्वयंसहायता बचत गटांचा आढावा, तसेच पाणलोट विकास कार्यक्रमाबाबतची माहिती खा. पटोले यांनी सबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली. यावेळी बैठकीमध्ये मत्सव्यवसाय व वनहक्क जमिनी पट्टे वाटप यावर विशेष चर्चा करण्यात आली.
विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील असण्यासोबतच जिल्ह्याचा विकास सर्व समन्वयातून साधावा, असे त्यांनी सांगितले. योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. या बैठकीस संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Planning and Effective Implementation Requirement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.