चपराशी करतो जनावरांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 00:58 IST2018-06-27T00:57:41+5:302018-06-27T00:58:38+5:30
येथील पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाचा कारभार आता रामभरोसे सुरू आहे. डॉक्टरऐवजी चपराशीच जनावरांची तपासणी करीत असल्याने आजारी जनावरांवर कोणता उपचार होत असेल, हे समजण्यापलिकडे आहे.

चपराशी करतो जनावरांची तपासणी
राजेश मुनिश्वर।
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : येथील पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाचा कारभार आता रामभरोसे सुरू आहे. डॉक्टरऐवजी चपराशीच जनावरांची तपासणी करीत असल्याने आजारी जनावरांवर कोणता उपचार होत असेल, हे समजण्यापलिकडे आहे.
कृषी क्षेत्रात महत्वाचा घटक म्हणून पशुसंवर्धन विभाग ओळखला जातो. पण जिल्ह्याचे अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षीत धोरणामुळे तालुक्यातील बहुतेक जागा रिक्त आहेत. काही पशुधन दवाखान्यात तर चपराशीच जनावरांची तपासणी करीत असल्याचे चित्र आहे. जनावरांना प्रतिबंधात्मक लसीकरण वेळेवर होत नसल्याने जनावरे दगावल्याचा प्रकार तालुक्यातील सौंदड व डोंगरगाव-खजरी या गावात घडला आहे.
मागील महिन्यात सौंदड येथील रविंद्र चांदेवार यांची ७० ते ८० हजार किंमतीची गाय ८ दिवसांत दगावली. चांदेवार यांनी गायीची प्रकृती बरी नसल्याची माहिती सौंदडच्या पशुधन अधिकाºयांना दिली. प्रत्यक्ष भेट देऊनही त्या अधिकाऱ्यांनी स्वत: जावून त्या गरीब शेतकऱ्याच्या गायीची तपासणी केली नाही. त्या शासकीय पशुधन अधिकाऱ्यांनी फुकटचा सल्ला देवून एका खासगी डॉक्टरला त्या शेतकऱ्याच्या घरी पाठवून गायीची तपासणी करण्यात आली. मात्र शासकीय डॉक्टराने वेळीच स्वत: उपाययोजना केली असती तर रविंद्र यांची गाय कदाचित दगावली नसती.
मागील महिन्यातच डोंगरगाव-खजरी येथील पुना कठाणे त्यांच्या दोन गायी एकाएकी मरण पावल्या होत्या. ही जनावरे मृत्युमुखी पडण्याची माहिती पशुधन अधिकाºयांना देण्यात आली. मात्र पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोणतीच उपाय योजना केली नाही. त्यामुळे पशुपालकांमध्ये पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे. एकीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे आधीच खचलेल्या शेतकऱ्यांना आता जनावरे दगावत असल्याने नुकसान सहन करावे लागत आहे.
तालुक्यात १०८ गावे आहेत. त्या गावांत १ लाख १६ हजार ४२९ पाळीव जनावरे असल्याची माहिती आहे. या जनावरांची निगा राखण्यासाठी तालुक्यातील ११ गावांमध्ये पशुधन दवाखाने निर्माण केले आहेत. त्यात जिल्हा परिषदेचे ७ व राज्याच्या ४ दवाखान्याचा समावेश आहे. तालुक्यात डोंगरगाव-खजरी, डव्वा, घाटबोरी-कोहळी, डोंगरगाव-डेपो हे स्टेटचे दवाखाने म्हणून ओळखली जातात. त्यात बहुतेक ठिकाणी डॉक्टरच नसल्याची बोंब आहे. या ठिकाणी प्रभारी डॉक्टरांची नियुक्ती केली जाते. पण तेथील चपराशीच डॉक्टरची भूमिका बजावत असल्याचे पशुपालक सांगतात.
तालुक्यातील सौदड, शेंडा, जांभळी-दोडके, कोसमतोंडी, पांढरी, चिखली, सडक-अर्जुनी येथे जिल्हा परिषदेचे पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. त्या दवाखान्यांमध्ये ‘रडत्याचे आसवे पुसण्या पुरतेच’ याप्रमाणे जनावरांची निगा घेतली जाते. लसीकरण वेळेवर केले जात नाही. औषधाचा साठा उपलब्ध राहत नाही. त्यामुळे महागड्या जनावरांचा औषधोपचार वेळीच होत नसल्यामुळे जनावरे दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. आता पाळीव जनावरांच्या किंमती भरमसाठ वाढल्याने जनावरे घेणे फारच कठीण झाले आहे.
तालुक्यातील जनावरांचे संगोपन करण्यासाठी गर्भधारणा, लसीकरण, कृत्रीम रेतन, नमूने तपासणी, बियाणे वाटप यातच कर्मचारी व्यस्त दिसतात. तर पशुसंवर्धन विभागाच्या योजना त्यात विशेष घटक दुधाळू जनावरे पुरवठा, शेळी गट पुरवठा, दुबत्या जनावरांना खाद्य पुरवठा अनुदान योजना, एकदिवसीय पिल्लू (कोंबडी) वाटप योजना, कामधेनू दत्तक ग्राम योजना राबविण्यासाठी कागदी घोडे नाचविण्यात अधिकारी व्यस्त असतात. मात्र मुख्य समस्येकडे या विभागाच्या अधिकाºयांचे दुलक्ष झाले आहे.
सेवा शुल्काच्या नावे पैशाची वसुली
शासनाच्या सेवा शुल्काच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून पैशाची मागणी केली जाते. त्यात मागील वर्षात ४१ हजार ३९० रुपये जमा झाले. मात्र सेवाच मिळत नसल्याने सेवा शुल्क तरी का भरावे, असाही सवाल केला जात आहे. सदर विभागाच्या नियोजनशून्यतेमुळे आता शेतकºयांच्या हातून त्यांच्या अर्थार्जनाचे साधन असलेले किमती जनावरे मृत्युमुखी पडत आहे.