उड्डाणपूल पाडण्यासाठी पुन्हा ‘तारीख पे तारीख’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 05:00 IST2020-06-15T05:00:00+5:302020-06-15T05:00:38+5:30
गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून हा पूल वाहतुकीस धोकादायक असल्याची बाब लोकमतने यासंदर्भात पाठपुरावा करुन प्रशासनाच्या लक्षात आणून दिली होती. तर रेल्वे विभागाने सुध्दा जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून रेल्वे ट्रॅक परिसरातील काही भाग केव्हाही कोसळण्याची शक्यता वर्तविली होती. तसेच हा जीर्ण पूल पाडण्याचे पत्र रेल्वे विभागाने जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते.

उड्डाणपूल पाडण्यासाठी पुन्हा ‘तारीख पे तारीख’
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून हा पूल जडवाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला आहे. हा जीर्ण झालेला उड्डाणपूल पाडून त्या ठिकाणी नवीन उड्डाणपूल तयार करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. जीर्ण उड्डाणपूल सहा महिन्यात पाडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र दोन वर्षांचा कालावधी लोटूनही यावर कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. रेल्वे विभागाकडून उड्डाणपूल पाडण्यासाठी तारीख पे तारीख दिली जात असल्याने शहरवासीयांवरील धोका वाढत आहे.
गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून हा पूल वाहतुकीस धोकादायक असल्याची बाब लोकमतने यासंदर्भात पाठपुरावा करुन प्रशासनाच्या लक्षात आणून दिली होती. तर रेल्वे विभागाने सुध्दा जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून रेल्वे ट्रॅक परिसरातील काही भाग केव्हाही कोसळण्याची शक्यता वर्तविली होती. तसेच हा जीर्ण पूल पाडण्याचे पत्र रेल्वे विभागाने जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. त्यानंतर या पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले होते. त्यात हा पूल जीर्ण झाला असून तो जडवाहतुकीस सुरू ठेवण्यास योग्य नसल्याची बाब पुढे आली होती. जीर्ण उड्डाणपूल पाडण्यासाठी रेल्वे विभागाने सहा महिन्याची मुदत दिली होती. मात्र याला आता दोन वर्षांचा कालावधी लोटला असून अद्यापही केवळ रेल्वे विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात तारीख पे तारीखचा खेळ सुरू आहे.
जुन्या जीर्ण उड्डाणपुलाचा काही भाग रेल्वे ट्रॅक परिसरात येत असल्याने पूल पाडताना रेल्वेचा मेगा ब्लॉक घ्यावा लागणार आहे. तसेच काही तांत्रीक बाबींसाठी रेल्वे प्रशासनाची मंजुरी आवश्यक आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने आत्तापर्यंत रेल्वे विभागाला तीनदा पत्र दिले आहे. मात्र त्यांनी यात काही त्रृट्या काढल्याने २६ मे २०२० रोजी त्रृट्या दूर करुन प्रस्ताव रेल्वे विभागाकडे पाठविण्यात आला आहे. त्यांची मंजुरी मिळताच पूल पाडण्यासाठी निविदा प्रक्रिया काढून पुढील प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
पूल पाडण्यासाठी एजन्सीची निवड
गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना जीर्ण उड्डाणपूल पाडण्यासाठी शासनाने ६ कोटी ५० लाख रूपयांची तरतूद केली आहे.पूल पाडण्यासाठी मुंबई येथील एका एजन्सीची निवड देखील करण्यात आली आहे. रेल्वे विभागाची मंजुरी मिळताच पूल पाडण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करुन काम सुरू केले जाणार असल्याची माहिती आहे. मात्र रेल्वेकडून मंजुरी मिळण्यास पुन्हा किती कालावधी लागतो आणि शहरवासीयांना पुन्हा किती दिवस जुन्या जीर्ण उड्डाणपुलाचा धोका पत्कारावा लागतो हे सांगणे मात्र अवघड आहे.
शहरवासीयांवरील धोका कायम
शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल पूर्णपणे जीर्ण झाला असून तो केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या गंभीर प्रश्नावर प्रशासनाकडून वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिले जात आहे.त्यामुळे शहरवासीयांवरील धोका कायम आहे. या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींचे सुध्दा दुर्लक्ष झाले आहे.