रुग्णांची सेवा हीच ईश्वर सेवा

By Admin | Updated: March 16, 2015 00:05 IST2015-03-16T00:05:12+5:302015-03-16T00:05:12+5:30

केशोरीचा परिसर मागास, दुर्गम व नक्षलग्रस्त आहे. या भागातील गोरगरीब जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम भगवती शिक्षण संस्था आणि संकल्प बहुउद्देशिय संस्थेच्या ...

Patients service is God's service | रुग्णांची सेवा हीच ईश्वर सेवा

रुग्णांची सेवा हीच ईश्वर सेवा

गोंदिया : केशोरीचा परिसर मागास, दुर्गम व नक्षलग्रस्त आहे. या भागातील गोरगरीब जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम भगवती शिक्षण संस्था आणि संकल्प बहुउद्देशिय संस्थेच्या फिरत्या आरोग्य पक्षकाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. संस्थेच्या माध्यमातून रुग्णांची करण्यात येत असलेली सेवा हिच ईश्वर सेवा असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
महिला आरोग्य अभियान पंधरवाड्यानिमित्त राष्ट्रीय ग्रामीण अभियानांतर्गत भगवती शिक्षण संस्था मेंढा व संकल्प बहुउद्देशिय संस्थेच्या फिरत्या वैद्यकीय पथकाच्यावतीने १४ मार्च रोजी अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील शासकीय माध्यकीय आश्रमशाळा ईळदा येथे आयोजित मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समिती सभापती प्रकाश गहाणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून अर्जुनी-मोरगाव पंचायत समिती सभापती तानेश तराम, उपसभापती पोमेश रामटेके, पंचायत समिती सदस्य कुंदा कुमरे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नामदेवराव कापगते, सरपंच राजकुमार भोयर, रघुनाथ लांजेवार उपस्थित होते.
पुढे बोलताना बडोले यांनी, वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांचे प्रमाण मोठे आहे. त्या तुलनेत तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे. दुर्गम भागातील गरीब रुग्णाला दुर्धर आजार झाला तर त्याला आर्थिकदृष्ट्या उपचार करणे शक्य होत नाही. सेवाभावीवृत्तीने काम करणाऱ्या संस्थेच्या डॉक्टरांनी भविष्यात या भागात विशेष रोगनिदान व उपचार शिबिर येथील जनतेसाठी घ्यावे. अपंगाची तपासणी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक युनीट देण्यात येईल.
प्रत्येक तालुक्यात आरोग्य विषयक कॅम्प घेऊन अपंगांना प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया आणखी सुलभ करण्याचा प्रस्ताव शासनाला दिला असून ईळदा येथे मंजूर झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगीतले.
अध्यक्षस्थानावरुन गहाणे यांनी, या भागात काही तिर्थस्थळे आहेत त्यांना तिर्थस्थळांचा दर्जा मिळाला तर तेथे मुलभूत सुविधा उपलब्ध होऊन यात्रेकरुंची गैरसोय दूर होण्यास मदत होईल. केशोरी येथील अधिकाऱ्यांचे रिक्त असलेले एक पद त्वरीत भरण्यात यावे, अशीही अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी तज्ज्ञ डॉ. पारधी, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. दुर्गाप्रसाद पटले, बालरोग तज्ज्ञ डॉ. ढवळे, डॉ. गगन वर्मा, डॉ. तृप्ती पंचभाई, तसेच केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णांची तपासणी केली. तसेच सिकलसेल रुग्णांची तपासणी दादाजी कोढे यांच्या संस्थेच्यावतीने करण्यात आली. शिबिरात ४५७ रुग्णांची नोंदणी करुन तपासणी करण्यात आली. १८ रुग्णांची विविध प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. केशोरी, गोठणगाव व धाबेपवनी प्राथमिक अरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावातील रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.
प्रास्ताविक डॉ. राजेंद्र जैन यांनी मांडले. संचालन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय गुज्जरवार यांनी केले. आभार डॉ. पिंकु मंडल यांनी मानले. कार्यक्रमासाठी संकल्प संस्थेचे डॉ. राजेंद्र जैन, डॉ. अशोक चौरसिया, डॉ. सतीश जयस्वाल, बी.आर. बडोले, भगवती शिक्षण संस्था मेंढाचे अध्यक्ष विठ्ठल मेश्राम व त्यांच्या सहकाऱ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Patients service is God's service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.