बंडखोरांमुळे रंगत
By Admin | Updated: October 8, 2014 23:28 IST2014-10-08T23:28:39+5:302014-10-08T23:28:39+5:30
विधानसभा निवडणुकीचा ज्वर आता कुठे वाढू लागला आहे. या मतदार संघात आपापल्या परीने सर्व १३ उमेदवार प्रचारकार्यात मश्गुल आहेत तर आपल्या गावात कोणती ‘सेलीब्रेटी’ येणार या उत्कंठेत

बंडखोरांमुळे रंगत
संतोष बुकावन - अर्जुनी/मोरगाव
विधानसभा निवडणुकीचा ज्वर आता कुठे वाढू लागला आहे. या मतदार संघात आपापल्या परीने सर्व १३ उमेदवार प्रचारकार्यात मश्गुल आहेत तर आपल्या गावात कोणती ‘सेलीब्रेटी’ येणार या उत्कंठेत मतदार बुडले आहेत. प्रमुख पक्षांतील युती-आघाडी तुटल्याने मतदार नेमका कोणत्या उमेदवाराला कौल देतील हे चित्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही. प्रचारासाठी कमी कालावधी असल्याने उमेदवार पूर्ण मतदारसंघ पिंजून काढण्याच्या कामात व्यस्त आहे. या मतदारसंघात भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना बंडखोरांचा सामना करावा लागत आहे.
अर्जुनी/मोरगाव विधानसभा क्षेत्र अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. या मतदारसंघातून भाजपचे राजकुमार बडोले यांनी २००९ च्या निवडणुकीत बाजी मारली. यावेळी मात्र सडक/अर्जुनी व अर्जुनी/मोरगाव या दोन्ही तालुक्यातून त्यांच्या उमेदवारीसाठी बराच विरोध झाला. मुलाखतीदरम्यान पक्षनिरीक्षकांना त्यांचा पाच वर्षाच्या कार्यकाळातील लेखाजोखा सादर करण्यात आला. तरीसुद्धा कार्यकर्ते असंतुष्ट असतानाही त्यांना पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी दिली. त्यांनी मतदारसंघातील ३८ गावे दत्तक घेतली असताना गावांचा विकास केला नाही, असे मतदार उघडपणे बोलत आहेत. दत्तक गावातील ग्रामस्थांची नाराजी व असंतुष्टांची मनधरणी करण्यात आलेले अपयश या दोन्ही बाजू बडोले यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहेत. त्यातच पंतप्र्नधान नरेंद्र मोदी भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले, मात्र त्यांनी शेतमालाच्या भाववाढीला स्पर्शही केला नाही. त्याचा विधानसभा निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करीत आहेत.
काँग्रेसची उमेदवारी राजेश नंदागवळी यांना देण्यात आली. या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांच्या ‘कोलांटउड्या’ सुरू होत्या. अखेर कवाडे यांच्या गटातून त्यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र यात दोन कार्यकर्त्यांनी बंडखोरी करुन निवडणूक रिंगणात उडी घेतली. पक्षाने उमेदवारी दिली नाही, आता धडा शिकवायचाच या उद्देशाने पेटलेले रत्नदीप दहिवले व अजय लांजेवार आपले भाग्य अजमावित आहेत. या बंडखोरीचाही फटका काँग्रेसला बसू शकतो.
महायुती तुटल्यानंतर भाजप उमेदवारांची घोषणा झाली. भाजप उमेदवारीच्या प्रयत्नात असलेल्या किरण कांबळे यांनी शेवटी शिवसेनेचे धनुष्य हातात घेतले. २००९ च्या निवडणुकीत त्यांंनी काँग्रेस पक्षातून बंडखोरी केली होती. भाजपमधील गटबाजी ही काही प्रमाणात किरण कांबळे यांच्या पाठीशी असल्याचे दिसून येते. त्या पूर्वीपासून भाजपमधून जिल्हा परिषद सदस्य असल्याने त्यांचा कार्यकर्त्यांशी जुनाच संबंध आहे. त्याचा कितपत लाभ होतो हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी पक्षातून उमेदवारी मिळविण्यासाठी मनोहर चंद्रीकापूरे यांनी निवडणुकीच्या पूर्वीपासूनच बाशिंग बांधून ठेवले होते. आघाडी तुटल्याबरोबर त्यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी पदरात पाडून घेतली. प्रशासनाचा दांडगा अनुभव असलेल्या चंद्रीकापुरे यांनी प्रथमच राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. कृषी खात्यात वरिष्ठ अधिकारी असल्याने त्यांची शेतकऱ्यांशी जवळीक आहे. मात्र त्यांना मतात परिवर्तीत करण्याची कसरत ते करू शकतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बहुजन समाज पार्टीच्या हत्तीवर माजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भीमराव मेश्राम आरुढ झाले आहेत. त्यांना बसपाच्या कॅडर मतांचा लाभ होईल. पण जनसामान्यांची मते ते कितपत जिंकणार याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. एकंदरित अर्जुनी/मोरगाव विधानसभेसाठी तुल्यबळ लढत आहे. ही लढत राष्ट्रवादीचे नेते खा.प्रफुल्ल पटेल व खा.नाना पटोले यांच्यासाठी प्रतिष्ठेची समजली जात आहे. खा.पटोले अद्यापही प्रचारात उतरले नाहीत. मात्र खा.पटेल प्रचारात व्यस्त आहेत. वर्चस्वाच्या या लढतीत नेमकी बाजी कोण मारणार, हे येणारा काळच ठरवेल.