धान उत्पादकांची सर्वांकडूनच लूट

By Admin | Updated: November 3, 2014 23:27 IST2014-11-03T23:27:05+5:302014-11-03T23:27:05+5:30

शासनाच्या हमीभावाने धानाची खरेदी करण्यासाठी सहकारी संस्था आणि साठवणुकीसाठी गोदाम मालक आपले गोदाम देण्यास तयार नाहीत. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांकडील धान खरेदीचा मोठा

Paddy growers looted by all | धान उत्पादकांची सर्वांकडूनच लूट

धान उत्पादकांची सर्वांकडूनच लूट

खरेदीचा तिढा कायम : व्यापाऱ्यांसोबत बाजार समित्यांतही कमी भावाने खरेदी
गोंदिया : शासनाच्या हमीभावाने धानाची खरेदी करण्यासाठी सहकारी संस्था आणि साठवणुकीसाठी गोदाम मालक आपले गोदाम देण्यास तयार नाहीत. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांकडील धान खरेदीचा मोठा तिढा निर्माण झाला आहे. याचा फायदा घेत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांचा धान मनमानी भावाने खरेदी केला जात आहे. दुसरीकडे काही ठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांनीही हमीभावाला बगल देत कमी दराने खरेदी सुरू केल्याने शेतकरी वर्ग सर्वत्र नागवला जात आहे.
आमगाव : यावर्षी धान उत्पादक शेतकऱ्यांनी चांगले उत्पादन घेतले आहे. हातात आलेले पीक योग्य भावाने विकून आर्थिक चणचण दूर करण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी आखले होते. मात्र शासनाच्या धोरणाने त्यांचे नियोजन पार कोलमडले आहे. शेतकऱ्यांनी पिकांची कापणी करून स्वत:वरील कर्जाचे ओझे कमी करण्यासाठी धान विक्रीसाठी काढले आहे. परंतु आधारभूत किंमत जाहीर करूनही आधारभूत किमतीनुसार शासकीय धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. त्यामुळे नाईलाजाने गरजवंत शेतकरी व्यापाऱ्यांच्या लुटीला बळी पडून कवडीमोल भावाने धानाची विक्री करीत आहे.
आमगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती वरदान ठरली आहे. शेतकरी दरवर्षी उत्पादित धानाला योग्य भाव मिळावा यासाठी बाजार समितीमध्ये विक्रीला आणतात. परंतु व्यवसायिकांची मक्तेदारी वाढल्याने शेतकऱ्यांचे धान कवडीमोल भावाने खरेदी-विक्री करण्यात येत आहे. आमगाव बाजार समितीमध्ये १ आॅक्टोबरपासून शेतकऱ्यांनी धान विक्रीला सुरूवात केली.
जय श्रीराम, एचएमटी, आरपी, पारस, एक हजार दहा, एक हजार एक, आयआर या जातीचे धान बाजार समितीत विक्रीला आले. १ आॅक्टोबर ते १ नोव्हेंबरपर्यंत एकूण २९८० क्विंटल धान विक्री करण्यात आले. बाजार समितीत व्यापाऱ्यांची मक्तेदारी सुरू असल्याने शेतकऱ्यांना धानाचे आधारभूत मुल्यच मिळत नाही. त्यामुळे जय श्रीराम, एचएमटी, आरपी, पारस या जातीच्या धानाला किमान १४३९ ते २६७५ पर्यंत तर हलक्या जातीच्या धानाला १२०० ते १२८० पर्यंत भाव दिला जात आहे.
बाजार समितीत व्यावसायिक शेतकऱ्यांच्या उत्पादित धानाला ओलसर व नरम असल्याचे कारण पुढे करून धानाला कमी भाव दिला जात आहे. त्यामुळे अपेक्षित किमतीला शेतकऱ्यांना मुकावे लागत आहे. त्यामुळे धान उत्पादनासाठी घेतलेले कर्ज फेडण्यासही ते असमर्थ ठरत आहेत. हातात पिक असूनसुध्दा किंमत मिळत नसल्याने बळीराजा पुन्हा कर्जाच्या ओझ्याखाली सापडण्याची वेळ आली आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Paddy growers looted by all

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.