भातपिकाचे क्षेत्र वाढणार
By Admin | Updated: November 24, 2014 22:58 IST2014-11-24T22:58:54+5:302014-11-24T22:58:54+5:30
खरीप हंगामात पावसाने दगा दिल्याने धानपिकाच्या उत्पादनात यावर्षी घट येत असली तरी शेतकऱ्यांना रबी हंगामाची आशा आहे. सध्या सर्वांच्या नजरा रबी हंगामातील धानपिकांकडे वळल्या आहेत.

भातपिकाचे क्षेत्र वाढणार
रबी हंगामाचे नियोजन : कडधान्य, गव्हाचीही लागवड वाढणार
देवानंद शहारे - गोंदिया
खरीप हंगामात पावसाने दगा दिल्याने धानपिकाच्या उत्पादनात यावर्षी घट येत असली तरी शेतकऱ्यांना रबी हंगामाची आशा आहे. सध्या सर्वांच्या नजरा रबी हंगामातील धानपिकांकडे वळल्या आहेत. त्यामुळे यावर्षी रबी हंगामात धानपिकाचे क्षेत्र वाढणार असून त्यादृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले आहे.
जिल्ह्यात रबी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र ३४ हजार २०० हेक्टर आहे. मात्र जिल्हा कृषी कार्यालयाने यंदा रबी पिकाच्या सर्वसाधारण क्षेत्रात वाढ करून ५१ हजार ५०० हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले आहे. त्यामुळे रबीच्या पिकांमधून तरी कर्जमुक्ती होईल, अशी आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
सर्वसाधारणपणे रबी पिकांमध्ये गहू, हरभरा, जवस, भाजीपाला, उन्हाळी भातपिकांसह इतर कडधान्य पिकांचा समावेश असतो. कडधान्य पिकांमध्ये लाखोळी, वाल, वटाणा, चवळी, मूग, उडीद व पोपट या पिकांचा समावेश आहे. सन २०१२-१३ मध्ये जिल्ह्यात एकूण ४४ हजार हेक्टरमध्ये रबी पिकांचे उत्पादन घेण्यात आले होते. यात गव्हाची लागवड दोन हजार ३७२ हेक्टर क्षेत्रात तर हरभऱ्याची लागवड सहा हजार ७९४ हेक्टर क्षेत्रात करण्यात आली होती. जवस पिकाची लागवड आठ हजार १४५ हेक्टर क्षेत्रात, भाजीपाला दोन हजार ०७४ हेक्टर क्षेत्रात तर उन्हाळी भातपिकाची लागवड ११ हजार ५०७ हेक्टर क्षेत्रात करण्यात आली होती. याशिवाय लाखोळी, वाल, वटाणा, चवळी, मूग, उळीद व पोपट या इतर कडधान्य पिकांची लागवड १९ हजार ९०७ हेक्टर क्षेत्रामध्ये करण्यात आली होती.
विशेष म्हणजे सन २०१२-१३ मध्ये लागवड झालेल्या रबी पिकांच्या क्षेत्रात सन २०१३-१४ मध्ये नऊ हजार ५७४ हेक्टरने वाढ झाली. यात हंगामात जिल्ह्यात एकूण ५३ हजार ५७८ हेक्टर क्षेत्रात रबीचे पीक घेण्यात आले. यात गहू दोन हजार ६६८ हेक्टरमध्ये, हरभरा सात हजार ८४१ हेक्टरमध्ये, जवस आठ हजार ८१२ हेक्टरमध्ये, भाजीपाला दोन हजार ३६८ हेक्टरमध्ये तर उन्हाळी भातपिकाची लागवड १८ हजार १०९ हेक्टर क्षेत्रामध्ये करण्यात आली होती. तसेच इतर कडधान्य पिकांमध्ये लाखोळी, वाल, वटाणा, चवळी, मूग, उळीद व पोपट यांची लागवड १० हजार ८०० हेक्टरमध्ये करण्यात आली होती.