कुपोषणावर मात करण्यासाठी तंटामुक्त समित्या सरसावल्या
By Admin | Updated: September 27, 2014 23:18 IST2014-09-27T23:18:21+5:302014-09-27T23:18:21+5:30
जिल्ह्यातील प्रत्येक गाव, प्रत्येक अंगणवाडी कुपोषणमुक्त व्हावी, यासाठी राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त अभियानाला नागरिकांचे सहकार्य मिळावे व या मोहिमेसाठी लोक चळवळ उभी राहावी,

कुपोषणावर मात करण्यासाठी तंटामुक्त समित्या सरसावल्या
गोंदिया : जिल्ह्यातील प्रत्येक गाव, प्रत्येक अंगणवाडी कुपोषणमुक्त व्हावी, यासाठी राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त अभियानाला नागरिकांचे सहकार्य मिळावे व या मोहिमेसाठी लोक चळवळ उभी राहावी, म्हणून एकात्मिक बाल विकास, जिल्हा परिषदेतर्फे प्रयत्न करण्यात य्ंोते. परंतु कुपोषण कमी होत नसल्याचे पाहून आता गावातील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती कुपोषणमुक्त गाव करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
राज्य शासनातर्फे राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त अभियान राबविला जात आहे. या अभियानाच्या माध्यमातून कुपोषित बालकांना सामान्य श्रेणीत आणण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणा तसेच महिला व बाल कल्याण विभागामार्फत प्रयत्न केले जात आहेत.
गोंदिया जिल्ह्यात १ हजार ७०० बालके कमी सौम्य कुपोषित तर २५५ बालके तीव्र कुपोषित आहेत तर १९ हजार बालके ही कमी वजनाची आहेत. कमी वजनात निरंतर काळ बालक राहिल्यास तो बालक कुपोषित होवू शकतो. यामुळे कमी वजनाच्या बालकांची योग्य काळजी घेऊन त्यांना सामान्य श्रेणीत आणण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा प्रयत्न करीत आहे. परंतु कुपोषण कमी होत नसल्याचे चित्र उभे असल्याने जिल्ह्यातील ५५६ गावातील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्या कुपोषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. जिल्ह्यातील १ हजार ५४७ अंगणवाड्यांमध्ये असलेल्या कमी वजनाच्या बालकांची काळजी कशी घेता येईल यासंबंधी चर्चा करुन आपले गाव कुपोषणमुक्त कसे करता येईल, यावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेणार आहेत. ग्राम बालविकास केंद्रात कुपोषित व कमी वजनाच्या बालकांना दाखल करुन त्यांना सामान्य श्रेणीत आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कुपोषित बालकांचे वजन वाढविण्यासाठी दिवसातून पाच ते सहा वेळा अतिरिक्त आहार दिला जाणार आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या सदस्यांचा कुपोषणमुक्तीसाठी सहकार्य घेण्यात येणार आहे. तंटामुक्त गाव मोहिम राबविणारे सदस्य यात महत्त्वाची भूमिका बजावतील. तंटे सोडविण्याबरोबर गावातील सार्वजनिक सण, उत्सव, मेळावे, महापुरूषांच्या जयंत्या शांततेत पार पाडले. गावातील विधवा, परित्यक्ता महिलांचे संरक्षण करणे, हुंडा पध्दतीवर आळा घालण्याचेही लोकोपयोगी कार्य महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने केले. (तालुका प्रतिनिधी)