पालिकेच्या ‘त्या’ शाळेत फक्त सातच विद्यार्थी
By Admin | Updated: July 5, 2014 23:38 IST2014-07-05T23:38:27+5:302014-07-05T23:38:27+5:30
एकीकडे शहरातील खाजगी शाळा विद्यार्थ्यांनी खचाखच भरलेल्या असतानाच पालिकेच्या शाळा मात्र ओस पडल्याचे दिसून येत आहे. खाजगी शाळांच्या यशस्वीतेमुळे पालिकेच्या शाळांना घरघर लागली आहे.

पालिकेच्या ‘त्या’ शाळेत फक्त सातच विद्यार्थी
शाळेची घरघर : पटसंख्या चालली घसरत
गोंदिया : एकीकडे शहरातील खाजगी शाळा विद्यार्थ्यांनी खचाखच भरलेल्या असतानाच पालिकेच्या शाळा मात्र ओस पडल्याचे दिसून येत आहे. खाजगी शाळांच्या यशस्वीतेमुळे पालिकेच्या शाळांना घरघर लागली आहे. याचे मुर्त उदाहरण म्हणजे सिव्हील लाईंस परिसरातील नगर परिषद मराठी प्राथमिक शाळा आहे. कारण फक्त सात विद्यार्थ्यांसाठी ही शाळा सुरू आहे. शाळेतील एकच शिक्षक येथील विद्यार्थ्यांना अ,आ,ई चे धडे देत आहे.
आज शहरातील खाजगी शाळांमधील नवनवीन अभ्यासक्रम, शिक्षणाची पद्धत, निकाल यासह अन्य बाबींमुळे पालकांचा कल खाजगी शाळांकडे वाढत चालला आहे. विशेष म्हणजे खाजगी शाळांचा १०० टक्के निकाल लागत असल्यामुळे त्या पालिकेच्या शाळांवर वरचढ ठरत आहेत.
परिणामी पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या रोडावत चाचली असून खाजगी शाळा विद्यार्थ्यांनी खचाखच भरलेल्या असताना पालिकेच्या शाळा मात्र बोटांवर मोजण्या इतक्या विद्यार्थ्यांना घेऊन बसल्याचे दिसून येते.
याचे मूर्त उदाहरण येथील सिव्हील लाईंस परिसरातील नगर परिषद मराठी प्राथमिक शाळा ठरत आहे. त्याचे असे की, नव्या शैक्षणिक सत्रात या शाळेत फक्त सात विद्यार्थी अ, आ, ई... चे धडे घेत आहेत. दोन मुले व पाच मुली अशी या शाळेची आजची पटसंख्या आहे.
वर्ग निहाय बघितल्यास पहिल्या वर्गात एक, दुसऱ्या वर्गात एक, तिसऱ्या वर्गात तीन तर चौथ्या वर्गात दोन विद्यार्थी आहेत. या शाळेची ही याच वर्षाची स्थिती नसून मागील वर्षी सुद्धा हाच प्रकार येथे होता. मागील वर्षी या शाळेत नऊ विद्यार्थी होते. तीन मुले व सहा मुली अशी पटसंख्या या शाळेची होती. शाळेची पक्की इमारत व मोठे मैदान उपलब्ध असताना मात्र शाळेत चिमुकल्यांचा किलबिलाट ऐकू येत नसल्याचे चित्र असून शाळा ओसाड दिसून येते.
या सात चिमुकल्यांना शिकविण्यासाठी एक शिक्षक असून तेच या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत. तर त्यांच्या सोबतीला एक परिचर देण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी जुनाट इमारतीत भरत असलेली ही शाळा विद्यार्थ्यांनी भरगच्च होती. हे चित्र बघता पालिकेने नवीन इमारतीचे बांधकाम केले. मात्र काळानुसार चित्र बदलत गेले व भव्य इमारत असतानाही आता येथे विद्यार्थी नसल्याने शाळा ओस दिसून येते. कॉन्वेंटचा फटका या शाळांना बसत असत आहे. पालिकेच्या अन्य शाळांची काही चांगली स्थिती नाही.
त्यातही शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू असल्याने येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकविणार कोण असा एक प्रश्न पालकांपुढे उपस्थित होते. वर्ग तीसरी व चौथीच्या पुस्तका बदलल्याने येथील शिक्षकांना सध्या रावणवाडी येथे प्रशिक्षणाला जावे लागत आहे. १ ते ५ जुलै दरम्यान वर्ग तिसरीचे तर सात ते ११ जुलै दरम्यान वर्ग चौथीचे प्रशिक्षण आहे.
अशात शिक्षक प्रशिक्षणात व शिक्षक नसल्याने विद्यार्थी आपल्या घरात अशी स्थिती निर्माण झाली आहे. तर पालिके कडूनही फक्त चालढकल कारभार सुरू असल्याचे दिसून येते. मात्र फक्त सात विद्यार्थ्यांसाठी ही शाळा सुरू असल्याचे ऐकून मात्र नागरीक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)