जिल्ह्यातील ५४७ ग्रामपंचायतींचे ऑनलाईन कामकाज झाले ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2022 05:00 IST2022-04-09T05:00:00+5:302022-04-09T05:00:06+5:30

१ ते ३३ नमुने अपडेट असेल तरच मानधन काढू अशी भूमिका कंपनीने घेतल्याने या संगणक परिचालकांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. मात्र बऱ्याच ग्रामपंचायतमध्ये १ ते ३३ नमुन्यांचा डाटाच नाही तर काही ग्रामपंचायतमध्ये हा डाटा अपूर्ण आहे. त्यामुळे तो ऑनलाईन करायचा कसा असा प्रश्न संगणक परिचालकांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे कंपनीने ही अट रद्द करावी या मागणीसाठी जिल्ह्यातील ५५६ संगणक परिचालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

Online work of 547 gram panchayats in the district came to a standstill | जिल्ह्यातील ५४७ ग्रामपंचायतींचे ऑनलाईन कामकाज झाले ठप्प

जिल्ह्यातील ५४७ ग्रामपंचायतींचे ऑनलाईन कामकाज झाले ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ग्रामपंचायतमध्ये कार्यरत संगणक परिचालकांनी थकीत मानधन आणि मानधन काढण्यासाठी लागू केलेली १ ते ३३ नमुन्यांची अट त्वरित रद्द करावी या मागणीला घेऊन जिल्ह्यातील ५८६ संगणक परिचालकांनी ४ एप्रिलपासून काम बंद  आंदोलन सुरू केले आहे. संगणक परिचालकांच्या मागण्या मंजूर न झाल्याने  मागील चार दिवसांपासून जिल्ह्यातील ५५६ ग्रामपंचायतीचे ऑनलाईन कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. 
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून २०११ पासून संग्राम संगणीकृत ग्रामीण महाराष्ट्र व सध्याचे आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर संगणक परिचालक म्हणून जिल्ह्यात ५५६ कर्मचारी मानधन तत्वावर कार्यरत आहे. या संगणक परिचालकांच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या डिजिटल सेवा पुरविणे, जमा खर्चाची नाेंद ऑनलाइन करणे, ग्रामसभा, मासिक सभा याचे ऑनलाइन आणि ऑफलाइन काम संगणक परिचालक करतात. मात्र या संगणक परिचालकांना मागील चार महिन्यांपासून मानधन मिळाले नाही. कंपनीने आता त्यांचे मानधन काढण्यासाठी काही जाचक अटी लागू केल्या आहे. 
१ ते ३३ नमुने अपडेट असेल तरच मानधन काढू अशी भूमिका कंपनीने घेतल्याने या संगणक परिचालकांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. मात्र बऱ्याच ग्रामपंचायतमध्ये १ ते ३३ नमुन्यांचा डाटाच नाही तर काही ग्रामपंचायतमध्ये हा डाटा अपूर्ण आहे. त्यामुळे तो ऑनलाईन करायचा कसा असा प्रश्न संगणक परिचालकांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे कंपनीने ही अट रद्द करावी या मागणीसाठी जिल्ह्यातील ५५६ संगणक परिचालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. कंपनीने ही अट रद्द न केल्यास आंदाेलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र साखरे, जिल्हा सचिव प्रमोदकुमार गौतम, उपाध्यक्ष टोलीराम नेलकर यांनी दिला आहे. 

 ...तर सोमवारपासून राज्यभरात आंदोलन 
- महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीमध्ये २७ हजार संगणक परिचालक कार्यरत आहे. कंपनीने संगणक परिचालकांची मागणी मान्य न केल्यास सोमवारपासून संपूर्ण राज्यभरातील संगणक परिचालक आंदोलनात सहभागी होणार असल्याचा इशारा दिला आहे.

आंदोलनाचा विद्यार्थ्यांना त्रास 
- ग्रामपंचायत अंतर्गत सर्वच प्रकारचे दाखले आता ऑनलाइन दिले जातात. मात्र संगणक परिचालकांचे मागील चार दिवसांपासून आंदोलन सुरू असल्याने विद्यार्थी तसेच गावकऱ्यांना दाखले मिळत नसल्याचे त्यांची कामे खोळंबली आहेत. 

 

Web Title: Online work of 547 gram panchayats in the district came to a standstill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.