करबुडव्यांविरूद्ध न.प. आक्रमक
By Admin | Updated: January 28, 2015 23:35 IST2015-01-28T23:35:22+5:302015-01-28T23:35:22+5:30
कर वसुली मोहीम दिवसेंदिवस जोर पकडत असताना नगर परिषदेच्या कर वसुली पथकाने कर न भरल्याप्रकरणी सिव्हील लाईन्स परिसरातील एक दुकान सील केले. कदाचीत नगर

करबुडव्यांविरूद्ध न.प. आक्रमक
गोंदिया : कर वसुली मोहीम दिवसेंदिवस जोर पकडत असताना नगर परिषदेच्या कर वसुली पथकाने कर न भरल्याप्रकरणी सिव्हील लाईन्स परिसरातील एक दुकान सील केले. कदाचीत नगर परिषदेच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असावी. मात्र या घटनेमुळे शहरात पालिकेच्या या कठोर कारवाईचे चांगलेच कौतुक केले जात आहे.
दुसरीकडे थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे. परिणामी कर वसुलीच्या रकमेत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
वादविवाद व हमरीतुमरीपासून नगर परिषदेच्या कर वसुली मोहिमेला सुरूवात झाली आहे. मात्र यंदा नगर परिषदेने कर वसुलीसाठी कंबर कसली असून वाटेत येत असलेली अडसर बाजूला सारून मुख्याधिकारी सुमंत मोरे यांच्या नेतृत्वात पथक मैदानात उतरले आहे. कर वसुलीच्या या मोहिमेंतर्गत मंगळवारी (दि.२७) पथकाने सिव्हील लाईन्स स्थित हर्षा मेठी मंदिरासमोरील प्रमोद शुक्ला यांच्या घरी धडक दिली. कमलाबाई शुक्ला यांच्या नावाने असलेल्या मालमत्तेचे सन १९९३ पासूनचे सुमारे एक लाख १८ हजार रूपयांचे कर थकून आहे. याबाबत कर विभागाने त्यांना नोटीस बजावून त्यानंतर जप्ती आदेश बजावले मात्र कर न भरल्यामुळे मोरे यांनी चर्चा केली. मात्र तोडगा न निघाल्याने पथकाने नाईलाजास्तव नगर परिषद अधिनियम १९६५ कलम १५२ अंतर्गत त्यांच्या दुकानाला सील ठोकले.
नगर परिषदेच्या इतिहासात दुकानाला सील ठोकण्यात आल्याची व पालिकेने एवढे कठोर पाऊल उचलल्याची ही अलिकडची पहिलीच घटना आहे. परिषदेच्या या कारवाईचे कौतुक केले जात असून या घटनेमुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत. कर वसुलीला प्रतिसाद लाभत आहे. परिणामी कर वसुलीचा आकडा वाढतच चालला असून शुक्रवारी (दि.२८) पथकाने ४.५० लाख रूपये रोख वसूल केले. (शहर प्रतिनिधी)