Now we guard our village | आता आम्ही आमच्या गावाचे रक्षक

आता आम्ही आमच्या गावाचे रक्षक

ठळक मुद्देकोरोनाचा प्रादुर्भाव : गावकऱ्यांचा गावबंदीचा निर्णय

लालसिंह चंदेल।
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरी : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून युध्द स्तरावर उपाय योजना केल्या जात आहे. त्यात आता ग्रामीण भागातील ग्रामपंचायती सुध्दा पुढे येत आहे. कोरोनाचा आपल्या गावामध्ये शिरकाव होऊ नये म्हणून आता गावकऱ्यांनी गाव बंदीचा निर्णय घेत आहे. तर काही ग्रामपंचायतीनी गाव दक्षता समित्या स्थापन करुन गावाच्या प्रवेशाव्दारावर ग्राम रक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात आता आम्हीच आमच्या गावाचे रक्षक असे चित्र आहे.
कोरोनाचा झपाट्याने प्रादुर्भाव वाढत असल्याने शासन आणि प्रशासनातर्फे उपाय योजना केल्या जात आहे. देशात सर्वत्र संचारबंदी लागू करुन नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे. तर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी सुध्दा यासाठी आता पुढाकार घेतला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील पाच गावांनी गाव बंदीचा निर्णय घेतला. तसेच गावकऱ्यांची परवानगी न घेता गावात प्रवेश करणाऱ्यांना अडीच हजार रुपयांच्या दंडाची सुध्दा तरतूद केली आहे. ऐवढेच नव्हे तर गावात कोणतेही वाहन अथवा बाहेरील नागरिक प्रवेश करु नये यासाठी गावाच्या प्रवेशव्दारावर लाकडे आणि झाडाच्या फांद्या टाकून मार्ग अडविण्यात आला आहे. तर सडक अर्जुनी तालुक्यातील डुंडा आणि पांढरी येथे गावकऱ्यांनी गाव दक्षता समितीची स्थापना करुन ग्राम सुरक्षा रक्षकाची नियुक्ती केली आहे. गावातील युवक पाळी पाळीने गावाच्या प्रवेशाव्दारा पहारा देत असून गावाबाहेरील व्यक्तीस गावात प्रवेश करण्यास मज्जाव करीत आहे. तर असाच निर्णय देवरी तालुक्यातील लोहारा ग्रामपंचायतने सुध्दा गावातील युवकांची ग्रामरक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. हे युवक गावाच्या प्रवेशव्दारावर दिवसभर पहारा देत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात आता आम्हीच आमच्या गावाचे रक्षक ही संकल्प रुढ होत असल्याचे चित्र आहे. ही सर्व उपाय योजना आपल्या गावातील नागरिकांचे आरोग्य सदृढ राहावे,त्यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी आहे.त्यामुळे गावकरी देखील यात सहकार्य करीत असल्याचे चित्र आहे.

गावांमध्ये सॅनिटायझेशन फवारणी करण्यास सुरूवात
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आता ग्रामपंचायतीने सुध्दा पुढाकार घेतला आहे.गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीने गावात सॅनिटायझरची फवारणी करण्यास सुरूवात केली आहे. शुक्रवारी जिल्ह्यातील केशोरीसह अनेक ग्रामपंचायतीने गावात सॅनिटायझर आणि डासनाशक फवारणी केली.

Web Title: Now we guard our village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.