आताचे राजकारण केवळ लाभासाठी
By Admin | Updated: August 9, 2015 01:48 IST2015-08-09T01:48:46+5:302015-08-09T01:48:46+5:30
स्वातंत्र्याच्या लढाईत आणि त्या काळच्या राजकारणातही त्यागाची भावना होती. परंतु आता राजकारणात प्राप्तीची आणि लाभाची भावना आहे.

आताचे राजकारण केवळ लाभासाठी
त्यागभावना संपली : स्वा.सं. सेनानी केवलचंद जैन यांचे परखड मत
लोकमत मुलाखत
नरेश रहिले गोंदिया
स्वातंत्र्याच्या लढाईत आणि त्या काळच्या राजकारणातही त्यागाची भावना होती. परंतु आता राजकारणात प्राप्तीची आणि लाभाची भावना आहे. जो तो मला या राजकारणातून काय मिळेल याचाच विचार करतो. त्यागाची किंवा देण्याची भावना मुळीच दिसत नाही, अशी खंत स्वातंत्र संग्राम सेनानी केवलचंद जैन यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीतून व्यक्त केली.
आॅगस्ट क्रांतीदिनाच्या पार्श्वभूमीवर जैन यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्वातंत्र्यकाळातील अनेक आठवणी जागविल्या. ते म्हणाले, देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी प्रत्येकाच्या मनात त्यागाची भावना होती. ती आताही प्रत्येक भारतीयाच्या मनात असणे आवश्यक आहे. स्वातंत्र्याच्या लढाईत बेरार प्रांताचे (विदर्भ-मध्यप्रदेश) महत्व होते. एप्रिल ते आॅक्टोबर १९४७ दरम्यान यवतमाळ येथे चर्चा झाली. त्यावेळी पहिल्यांदा लोकांना देश पारतंत्र्यातून मुक्त होत आहे असे वाटले. १५ आॅगस्टची पूर्वसंध्या आणि १५ आॅगस्टचा दिवस लोकांनी जागून काढला होता.
१९४२ मध्ये झालेल्या आंदोलनात इंग्रजाच्या विरोधात प्रचंड आक्रोश वाढला होता. आणखी जास्त काळ भारतात राहील्यास आपली हाणी होऊ शकते, असे इंग्रजांच्या लक्षात आले. ९ आॅगस्ट १९४२ चे आंदोलन सर्वात मोठे आंदोलन होते.
सेवाग्राम येथे कॉंग्रेसची बैठक व मुंबईच्या गवालिया मैदानावर ‘करो या मरो, अंग्रेज भारत छोड़ो’ चे नारे लावण्यात आले. त्यावेळी रेडिओ आल्याने लोकही आंदोलनासोबत जुळले. आंदोलनाची तीव्रता पाहून सरकार घाबरले व त्यांनी लोकांना जेलमध्ये टाकण्याचा सपाटा सुरू केला. त्यामुळे ९ आॅगस्टला सर्वात जास्त अटक करण्यात आल्याचे जैन यांनी सांगितले.
गोंदियातील अनेकांचा स्वातंत्र्यलढ्यात सहभाग
स्वातंत्र्याच्या लढ्यात जिल्ह्यातील अनेकांचा सहभाग होता. त्यांच्यासोबत चतुर्भूज जसानी, केशवराव इंगळे, पन्नालाल दुबे, सोहनलाल मिश्रा, बाबा जोगलेकर, गिरधारीलाल शर्मा, रघुनाथदास शर्मा, सुखदेव वासुदेव अग्रवाल यांनी स्वातंत्र्याच्या लढाईत सहभाग घेतला, असे जैन म्हणाले.
दोन वेळा आले होते महात्मा गांधी
स्व.जवाहरलाल नेहरू १९४१ मध्ये कलकत्यावरून वर्धा जात होते. त्यांनी १० मिनीटे गोंदियाच्या रेल्वेस्थानकावर थांबून लोकांना मार्गदर्शन केले. सन १९२७ व १९३३ मध्ये महात्मा गांधी दोन वेळा भंडारा व दोन वेळा गोंदियात आले. १९३३ च्या गांधीजींच्या सभेत मोठी गर्दी होती.
गोंदिया-भंडाऱ्यात फायरिंंग
९ आॅगस्टला गोंदियात मोर्चा काढला. या मोर्चात सहभागी झालेल्या लोकांना पोलिसांनी अटक केली. गोंदियात पहिल्यावेळी १२ ते १३ हजार लोकांनी पोलीस ठाण्याचा घेराव केला होता. अटक केल्यानंतर दुसऱ्या दिवशी भंडारा येथे पाठविण्यात आले. ९ ते १६ आॅगस्टदररम्यान जिल्ह्यातील ४५० ते ४७५ लोकांना तुरूंगात टाकले होते. भंडारा व तुमसर येथे तसेच गोंदिया येथे फायरिंग झाली. यावेळी अटक झालेल्या महिलांमध्ये सात ते आठ महिलासुद्धा होत्या.
चार वेळा भोगला तुरूंगवास
१९४३ मध्ये भंडाराचे मोतीलाल लांजेवार यांनी विचारलेल्या पत्राला आपण पत्र लिहून उत्तर दिल्याने आपल्याला तुरूंगात जावे लागले, असे केवलचंद जैन यांनी यांनी सांगितले. आंदोलन उग्र असावे असे आपण लिहीले होते. त्यामुळे बॉम्ब तयार करण्याची योजना असावी या संशयावरून पोलिसांनी आपल्याला अटक केली. तसेच लांजेवार यांचे घर फोडून शोधमोहीम राबविली. जैन पहिल्यावेळी १९४१ मध्ये, दुसऱ्यावेळी १९४२, तिसऱ्यावेळी १९४३ तर चौथ्यावेळी १९४५ मध्ये तुरूंगात गेले. त्यावेळचे वातावरण उत्साही होते. वयाच्या १३ व्या वर्षातच आपण स्वातंत्र्यलढ्यात उतरल्याचे त्यांनी सांगितले.
स्वातंत्र्य संग्राम सेनानी जैन १९८० ते १९८६ पर्यंत विधान परिषदेचे सदस्य होते. १९८२-८३ मध्ये ते राज्याचे नियोजन, विधायक कार्य, ऊर्जा, उत्पादन शुल्क, वन, मद्य निषेध या विभागाचे राज्यमंत्री होते. १९८४-८५ मध्ये उच्चाधिकार समितीचे सचिव होते. वडील कन्हैयालाल जैन हेसुद्धा काँग्रेस कार्यकर्ता होते.
माझ्या वडीलांना पुस्तके वाचण्याचा छंद होता. अलाहाबादवरून त्यावेळी चांद नावाचे वृत्तपत्र निघत होते. त्या वृत्तपत्राने २०० पानांची ‘फासी’ नावाची पुरवणी काढली. त्यात शहीदांची संपुर्ण माहिती होती. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात १९४२ पर्यंत कुणाकुणाला फाशी झाली याची माहिती होती. यातून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्याच्या लढाईत उतरल्याचे जैन म्हणाले.