प्रसूतिदरम्यान एकाही मातेचा मृत्यू नाही

By Admin | Updated: July 10, 2016 01:12 IST2016-07-10T01:12:22+5:302016-07-10T01:12:22+5:30

जागतिकस्तरावर आईची प्रकृती व मातामृत्यू यावरूनच त्या देशाचा, त्या राज्याचा व त्या क्षेत्राच्या विकासाचा दर ठरविला जातो.

Not a single mother dies during delivery | प्रसूतिदरम्यान एकाही मातेचा मृत्यू नाही

प्रसूतिदरम्यान एकाही मातेचा मृत्यू नाही

नरेश रहिले ल्ल गोंदिया
जागतिकस्तरावर आईची प्रकृती व मातामृत्यू यावरूनच त्या देशाचा, त्या राज्याचा व त्या क्षेत्राच्या विकासाचा दर ठरविला जातो. जर माता सशक्त असतील तरच त्या सुदृढ बाळास जन्म देवू शकतात. त्यासाठी शासन माता मृत्यू संदर्भात अत्यंत संवेदनशील आहे. प्रसूती पूर्व व प्रसूतीनंतर मागच्या वर्षी आठ महिलांचा मृत्यू झाला. परंतु प्रसूती दरम्यान एकाही मातेचा मृत्यू झाला नाही हे आरोग्य यंत्रणेचे यश आहे.
स्त्री व पुरूष यांच्या शरीररचनेसह विचार करण्याच्या पद्धतीत निसर्गानेच फरक केला आहे. मासिक पाळीमुळे दर महिन्यात महिलांच्या रक्ताचे प्रमाण कमी-अधिक होते. शिवाय गरोदर स्त्रीला तर रक्ताची जास्तच गरज असते. परंतु जिल्ह्यातील महिला गर्भावस्थेत खानपानाकडे विशेष लक्ष देत नसल्याने महिलांना रक्तक्षयाचा आजार भेडसावतो. यातूनच प्रसूतीपूर्वी किंवा प्रसूतीनंतर प्रकृती खालावून महिला दगावतात.
सन २०१३ च्या एसआरएसनुसार भारताचा माता मृत्यूदर एकलाख जीवंत जन्मामागे १६७ आहे. तर महाराष्ट्राचा ६७ आहे. गोंदिया जिल्ह्यात एचएमआयएस नुसार एक लाख जिवंत जन्मामागे सन २०१५-१६ या वर्षात ४२.२५ एवढा आहे. सन २०१४-१५ या वर्षात ६७.९१ होता. मागील सहा वर्षाची मातामृत्यू संदर्भात आकडेवारी पाहता मातामृत्यू दरवर्षी घटत आहेत. याला महत्वाचे कारण म्हणजे आरोग्य संस्थेत शंभर टक्के प्रसूती असे आहे.
गोंदिया जिल्ह्यात सन २०१०-११ या वर्षात ३३ मातांचा मृत्यू झाल्या होत्या. सन २०११-१२ या वर्षात १७, सन २०१२-१३ या वर्षात १३, २०१३-१४ या वर्षात १५, २०१४-१५ या वर्षात १२ तर २०१५-१६ या वर्षात आठ अशा सहा वर्षात ९८ मातांचा मृत्यू झाला आहे. परंतु प्रसूतीदरम्यान मागच्या वर्षी एकाही महिलेचा मृत्यू झाला नाही हे विशेष.
आदिवासी बहुल गोंदिया जिल्ह्यातील माता व बालक दोन्ही सुरक्षीत असावे याकरिता महिलांची प्रसूती आरोग्य संस्थेतच व्हावी यासाठी जनजागृती करण्यात आली. त्यामुळे घरात प्रसूती होण्याचे प्रमाण आता नगण्य आहे. जिल्ह्यात शंभर टक्के प्रसूती रूग्णालयातच होत आहेत. शासकीय रूग्णालयात ८९.०४ टक्के तर खासगीत १०.७१ टक्के प्रसूती झाल्या आहेत.
त्यामुळे माता व बालमृत्यूमध्ये बरीच घट आली आहे. जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम (जेएसएसके) अंतर्गत जिल्हा रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात सन २०१५ या वर्षात २१ हजार ७६९ गर्भवतींची नोंदणी करण्यात आली. यात १८ हजार ६६६ महिलांनी प्रसूतीसाठी नोंदणी केली. १७ हजार ६३ महिलांची शासकीय आरोग्य संस्थेत तर २०५४ महिलांची खासगी रूग्णालयात प्रसूती करण्यात आली. यात गोंदियात २०४६ व अर्जुनी-मोरगावात८ प्रसूती खासगी रूग्णालयात झाल्या. उर्वरीत सहा तालुक्यातील खासगी रूग्णालयात एकही प्रसूती झाली नाही.

महिलांनो याकडे लक्ष द्या
कुपोषित बाळ जन्माला येवू नये यासाठी स्त्रियांना मोठी काळजी घ्यावी लागते. शरीर, मनाने विकसित झाल्याशिवाय व शरीर गर्भधारणेसाठी तयार झाल्याशिवाय स्त्रियांनी लग्न करू नये. वयोमानानुसार १८ वर्षांपूर्वी मुलीने लग्न करू नये, लग्नानंतर पहिली मासिक पाळी चुकते तेव्हा वैद्यकीय सल्ला व तपासण्या करून घेणे आवश्यक असते. शरीरास आवश्यक असलेले अन्नघटक आपल्या आहारातून मिळतात किंवा नाही, याकडे लक्ष देणे गरजेचे असते. असे अन्नघटक किंवा जीवनसत्वे आहारात मिळत नसतील तर योग्य अन्नघटकांचा वापर आपल्या आहारात करणे गरजेचे आहे. महिलेच्या शरीरात रक्ताची (हिमोग्लोबिन) कमतरता असेल तर होणारे बाळ कुपोषित होण्याची शक्यता असते.

तपासण्या योग्य वेळी करा
महिलांनी प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतर नियमित वैद्यकीय तपासण्या करणे गरजेचे आहे. यात रक्तदाब, गर्भाचा घेर, रक्ताचे प्रमाण, आईचे वजन आदी तपासण्या प्रामुख्याने करणे गरजेचे असते. यातून होणारे बाळ सशक्त आहे किंवा नाही हे समजते. आईचे वजन वाढत असेल व रक्ताचे प्रमाणही योग्य असेल तर होणारे बाळ सुदृढ असते.

१५ हजार ५०५ महिलांचा मोफत प्रवास
जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमांतर्गत प्रसूती झालेल्या महिलेला व तिच्या बाळाला घरून रूग्णालय व रूग्णालयातून घरी सोडण्यासाठी मोफत रूग्णवाहिका पुरविण्यात येते. आरोग्य संस्थेत झालेल्या १६ हजार ८६१ प्रसूतीपैकी १४ हजार ८ महिलांना घरून रूग्णालयात सोडण्यात आले. ६८४ महिलांनी इतर वाहनांचा आधार घेतला. एका रूग्णालयातून दुसऱ्या रूग्णालयात जाण्यासाठी ५ हजार २२८ महिलांनी शासकीय तर २१६ महिलांनी इतर वाहनांची मदत घेतली. १६ हजार १६९ प्रसूती झालेल्या महिलांपैकी १५ हजार ५०५ महिलांनी शासकीय रूग्णवाहीकेची मदत घेतली. ३३२५ नवजात बालकांना या वाहन सेवेचा लाभ मिळाला. ३० दिवसानंतर १ हजार ११६ नवजात बालकांना घरून रूग्णालयात सोडण्यात आले.

महिलांना उद्भवणारे आजार
गोंदिया जिल्ह्यातील महिलांमध्ये आढळणाऱ्या आजारात सर्वप्रथम रक्तक्षयाचा क्रमांक आहे. शरीरात रक्ताची कमतरता असणे, त्यामुळे नंतर रक्तदाबाचा (बी.पी) आजार होण्याची शक्यता असते. त्यानंतर तिसरी स्टेप म्हणजे गर्भाला विषबाधा होणे. यात आईच्या जीवाला धोका होण्याची शक्यता असते. मात्र ही बाधा शोधण्याचे अत्याधुनिक तंत्र आता निघाले आहे.

१०,५४४ महिलांना योजनेचा लाभ
४ जननीसाठी मदत करणारी ‘जननी सुरक्षा योजना’ ग्रामीण क्षेत्रातील महिलांसाठी तारणहार झाली आहे. सन २०१५-१६ या वर्षात या योजनेंतर्गत अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) व इतर मागास वर्गीय (बीपीएल) च्या १० हजार ५४४ महिलांना लाभ देण्यात आला आहे. तर १३ हजार २३० आशा सेविकांना लाभ देण्यात आला आहे. गरिब महिलांना आधार देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने गर्भवतींना प्रसूतीनंतर देण्यात येणाऱ्या जननी सुरक्षा योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात घेतला जात आहे.

Web Title: Not a single mother dies during delivery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.