भीमाबाईच्या जीवनात उगवली विकासाची नवीन पहाट

By Admin | Updated: May 7, 2016 01:50 IST2016-05-07T01:50:43+5:302016-05-07T01:50:43+5:30

स्त्री आणि पुरूष ही जीवनाच्या रथाची चाके आहे. ही चाके व्यवस्थीत चालली की संसाररुपी जीवनाचं रहाट गाडगं व्यवस्थीत चालण्यास मदत होते.

The new dawn of development grew in the life of Bhimabai | भीमाबाईच्या जीवनात उगवली विकासाची नवीन पहाट

भीमाबाईच्या जीवनात उगवली विकासाची नवीन पहाट

महिलांना गावातच रोजगार : इतर बचत गटांनाही करतात मार्गदर्शन
गोंदिया : स्त्री आणि पुरूष ही जीवनाच्या रथाची चाके आहे. ही चाके व्यवस्थीत चालली की संसाररुपी जीवनाचं रहाट गाडगं व्यवस्थीत चालण्यास मदत होते. ग्रामीण भागातील महिला आता बचत गटाच्या माध्यमातून कुटुंबातील कर्त्या पुरु षाला अर्थात कुटुंबाच्या अर्थार्जनात हातभार लावीत आहे.
अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध हे गाव. या गावाची ओळख म्हणजे प्रसिध्द पर्यटनस्थळ म्हणून आहे. नवेगावबांधमध्ये डिसेंबर २००३ मध्ये दहा महिलांनी एकत्र येऊन सिध्दार्थ स्वयं सहायता बचतगटाची स्थापना केली. त्या बचतगटाच्या सदस्यांपैकी भीमाबाई शहारे ह्या एक. शेतीच्या हंगामाशिवाय कामाची वणवा असताना अशावेळी कोणते काम करावे हा प्रश्न भीमाबाईसह इतर महिलांना भेडसावत असे. भीमाबाई व त्यांच्या बचत गटातील महिला विविध समाजसुधारकांची जयंती वा पुण्यतिथी साजरी करीत असत. या विचारातून त्यांनी डिसेंबर २००३ मध्ये सिध्दार्थ बचत गटाची स्थापना केली.
नवेगावबांधमध्ये कुठले कार्यक्रम घ्यायचे असले तर कार्यक्रमासाठी आवश्यक असणारे साहित्य बाहेर गावातून आणावे लागत असे. आपल्या गटाने हे साहित्य खरेदी केल्यास गावामध्येच साहित्य सहजतेने उपलब्ध होईल आणि आपल्या गटाला यापासून उत्पन्नसुद्धा मिळेल या विचाराने गटाच्या बचतीतून आणि मिळालेल्या पाच हजार रूपयांच्या फिरत्या निधीतून १०० खुर्च्या, गाद्या आणि स्वयंपाकाची भांडी घेऊन व्यवसायाला सुरूवात केली. गावात गटाद्वारे साहित्य उपलब्ध झाल्याने गावकरी आनंदीत झाले. बिछायतच्या व्यवसायातून बचत गटाची झालेली प्रगती पाहता सिध्दार्थ बचतगटाने एक लाख ५० हजार रूपये बँकेचे कर्ज घेतले. विविध कार्यक्र मासाठी भाडे देऊन साहित्य घेतल्याने मिळालेल्या उत्पन्नातून बँकेच्या कर्जाची पूर्ण परतफेड करण्यात आली. या व्यवसायामुळे महिलांना गावातच रोजगारसुद्धा मिळत आहे.
महिलांच्या या कामामुळे आणि भीमाबाईच्या पुढाकाराने बचत गटातील महिलांना गावात आज मान मिळत आहे. भीमाबाई तर स्वत: हिशोब करु न गटाचे पूर्ण व्यवहार सांभाळतात आणि इतर बचत गटांनासुध्दा मार्गदर्शन करतात. बचत गटातील सर्व महिला साक्षर आहेत. त्यामुळे आर्थिक व्यवहार सांभाळणे सोपे जाते.
सिध्दार्थ महिला स्वयंसहायता बचत गटाचा हा चढता आलेख भीमाबाईच्या प्रेरणेने विकासाची नवी पहाट घेऊन आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The new dawn of development grew in the life of Bhimabai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.