लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी (गोंदिया) : घराच्या झोपलेल्या महिलेवर छप्परीत बिबट्याने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना रविवारी (दि.२८) सकाळी तालुक्यातील जामनझुरी धमदीटोला येथे उघडकीस आली. प्रभाबाई शंकर कोराम (वय ४९) रा. आलेवाडा, असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनक्षेत्रात २५ सप्टेंबर रोजी पाच वर्षीय बालकावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असतानाच दक्षिण क्षेत्र देवरीअंतर्गत येणाऱ्या पळसगाव चुटिया ग्रामपंचायत अंतर्गत जामनझुरी (धमदिटोला) येथे रविवारी सकाळी दुसरी घटना घडली. प्रभाबाई कोराम या गेल्या एक महिन्यापासून मुलीच्या बाळंतपणासाठी जामनझुरी येथे आल्या होत्या. शनिवारी (दि.२७) रात्री संपूर्ण कुटुंब रात्रीचे जेवण घेऊन झोपी गेले. प्रभाबाई घराच्या छप्परीत झोपल्या. त्या साखरझोपेत असतानाच बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करत घराच्या मागच्या बाजूस तुरीच्या वाडीत फरफटत नेत ठार केले.
सकाळी घरातील लोक जागे झाल्यानंतर प्रभाबाईचा मृतदेह घरामागील तुरीच्या वाडीत आढळल्याने कुटुंबीयांनी आरडाओरड केली. यानंतर घटनास्थळी गावकरी जमा झाले. वन अधिकाऱ्यांना, तसेच पोलिस अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. या घटनेनंतर गावकऱ्यांनी वन विभागावर रोष व्यक्त केला. तीन दिवसांच्या कालावधीत बिबट्याने दुसरा बळी घेतला असून, या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मुलीच्या बाळंतपणासाठी आलेल्या आईचा गेला बळी
- प्रभाबाई कोराम यांच्या मुलीचे सासर देवरी तालुक्यातील जामनझुरी धमदीटोला येथील आहे.
- त्या मुलीच्या बाळंतपणासाठी गेल्या महिनाभरापासून मुलीला मदत करण्यासाठी आल्या होत्या.
- बाळंतपणासाठी आई मदतीला आल्याने मुलगी देखील खूश होती.
- सर्व सुरळीत सुरू असतानाच साखर झोपेत असलेल्या प्रभावर हल्ला करून जागीच ठार केल्याने संपूर्ण कुटुंबच हादरून गेले. तर, या घटनेमुळे कोराम कुटुंबासह गावकरी सुद्धा हळहळले.
Web Summary : In a tragic incident, a leopard attacked and killed Prabhabai Koram in Jamanzhuri Dhamditola while she slept. This follows another recent fatality where a tiger killed a child, sparking fear and anger among villagers.
Web Summary : जामनझुरी धमदीटोला में सो रही प्रभाबाई कोराम पर तेंदुए ने हमला कर मार डाला। हाल ही में एक बाघ द्वारा बच्चे को मारे जाने की घटना के बाद ग्रामीणों में डर और गुस्सा है।