गोंदिया : जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. मार्चच्या अखेरीस कोरोनाबाधित रुग्ण आणि मृतांच्या संख्येतसुध्दा सातत्याने वाढ होत आहे. एप्रिल महिन्यात तर भयावह स्थिती निर्माण झाली आहे. केवळ दहा ते बारा दिवसांच्या कालावधीत दीडशे रुग्णांचा शासकीय आणि खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तर बरेच रुग्ण आजाराची माहिती लपवून घरीच राहत असल्याने त्यांचा उपचारापूर्वीच घरीच मृत्यू होत असल्याचे चित्र आहे. मागील तीन महिन्याच्या कालावधीत जवळपास ८० हून अधिक रुग्णांचा घरीच मृत्यू झाला आहे. मात्र यापेक्षासुध्दा हा आकडा अधिक असण्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तविली आहे. बरेच नागरिक भीतीपोटी टेस्ट करीत नसून आजार लपवीत आहेत. परिणामी अशा रुग्णांचा घरीच मृत्यू होत आहे. तर काही नागरिक कोरोनाने मृत्यू झाला असला तरी त्याची प्रशासनाला माहिती देत नसल्याची माहिती आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला सुध्दा त्यांच्यापर्यंत वेळीच पोहचून उपचार करण्यास अडचण निर्माण होत आहे.
.........
१० टक्के मृत्यू घरातच
एप्रिल महिन्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रुग्णालयातसुध्दा बेड मिळणे कठीण झाले आहे. तर ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर आणि कोरोनावरील औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा सर्व वातावरणामुळे बरेच रुग्ण रुग्णालयात जाण्याऐवजी घरीच राहत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर वेळीच उपचार न झाल्याने घरीच मृत्यू होत असल्याचे चित्र आहे. एकूण मृत्यूपैकी जवळपास १५ टक्के मृत्यू हे घरीच होत आहेत. तीन महिन्यात जिल्ह्यात २२० बाधितांचा मृत्यू झाला आहे.
........
होम क्वारंटाईन रुग्णांची संख्या अधिक
जिल्ह्यात दररोज पाचशे ते सातशे कोरोना बाधित रुग्णांची भर पडत आहे. यामुळे शासकीय व खासगी रुग्णालयातसुध्दा बेड्स मिळणे कठीण झाले आहे. सौम्य आजाराच्या रुग्णांना घरीच गृहविलगीकरणात राहण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे. त्यामुळे गृहविलगीकरणात जवळपास ४ हजारावर रुग्ण आहेत.
.........
एकूण रुग्ण :
एकूण उपचार सुरू असलेले रुग्ण :
एकूण बरे झालेले रुग्ण :
गृहविलगीकरणात असलेले एकूण रुग्ण :
......
कारणे काय
कोरोनाबाबत अद्यापही नागरिकांमध्ये संभ्रमाचे आणि भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे बरेच जण कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतरही उपचारासाठी जात नाही. कोरोनाची माहिती लपवित घरीच थातूरमातूर उपचार करतात. त्यामुळे त्यांच्यापासून कुटुंबीयांनासुध्दा संसर्ग वाढत आहे. अशात गंभीर रुग्णांचा घरीच मृत्यू होत आहे. लक्षणे दिसताच जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घेतल्यास अनेकांचे प्राण वाचविणे शक्य आहे.
.........
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेणे अथवा जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन कोरोनाची चाचणी करून घेणे आवश्यक आहे. मात्र बरेच रुग्ण याकडे दुर्लक्ष करीत असल्याने संसर्गात वाढ होत असून उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे वेळीच सजग होत उपचार घेण्याची गरज आहे.
- डॉ. अमरिश मोहबे, जिल्हा शल्यचिकित्सक.