महावितरणला २५ लाखांचा ‘शॉक’
By Admin | Updated: May 7, 2016 01:51 IST2016-05-07T01:51:54+5:302016-05-07T01:51:54+5:30
अवकाळी व वादळी वाऱ्याने जिल्ह्यात चांगलाच कहर केला असून जनजीवन विस्कळीत केले आहे. नुकसानीच्या या फटक्यातून वीज वितरण कंपनीही सुटली नाही.

महावितरणला २५ लाखांचा ‘शॉक’
वादळाने दिला झटका : खांब व वाहिन्या तुटल्या
गोंदिया : अवकाळी व वादळी वाऱ्याने जिल्ह्यात चांगलाच कहर केला असून जनजीवन विस्कळीत केले आहे. नुकसानीच्या या फटक्यातून वीज वितरण कंपनीही सुटली नाही. महावितरणला सुमारे २५ लाखांचा ‘शॉक’ बसला आहे.
मागील १५ दिवसांपासून अवकाळी व वादळीवाऱ्याने जिल्ह्यातील वातावरण बदलून टाकले आहे. या पाऊस व तुफानामुळे मे महिन्यातच पावसाळा सुरू झाल्यासारखे चित्र बघावयास मिळत आहे. हा अवकाळी पाऊस जेवढा नुकसानकारक ठरत आहे तेवढेच नुकसान वादळीवाऱ्याने केले आहे. कुठे झाडे पडत आहेत तर कुठे घरांची पडझड होत आहे. पावसाने पिकांची नासाडी होत असून शेतकरी हतबल झाला आहे.
या सर्व प्रकारांमुळे वीज वितरण कंपनीलाही आपल्या पाशात घेतले आहे. या अवकाळी व वादळी वाऱ्यामुळे वीज कंपनीचे सुमारे २५ लाख रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. यात कुठे वीजेचे खांब पडले आहेत तर कुठे वाहिन्या तुटल्या आहेत. विद्युत रोहित्रांतही बिघाड आला असून अवघा जिल्हा अस्तव्यस्त झाला आहे. दुरूस्तीसाठी वीज कंपनीची कसरत सुरू आहे. अनेक भागात यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे.
गेल्या १५ दिवसात अनेक वेळा वादळी वाऱ्याने नुकसान केले. परिणामी वीज पुरवठा खंडीत होत आहे. निसर्गाच्या या लहरीपणाचा फटका वीज कंपनीसह सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. (शहर प्रतिनिधी)