महिलेची छेड काढणाऱ्या महाराजाला नागरिकांनी बदडले, व्हिडिओ व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2022 17:22 IST2022-01-07T17:01:58+5:302022-01-07T17:22:56+5:30
महाराजाला पीडित महिलेने आपल्या घरी पूजेकरिता बोलाविले होते. दुपारी ३ नंतर पूजापाठ सुरू असताना या महाराजाने महिलेसोबत छेडखानी करीत अभद्र व्यवहार केला.

महिलेची छेड काढणाऱ्या महाराजाला नागरिकांनी बदडले, व्हिडिओ व्हायरल
गोंदिया : महिलेची छेडखानी करणाऱ्या एका महाराजाला जमावाने चांगलाच चोप दिल्याची घटना गोंदिया तालुक्यातील अंभोरा येथे गुरुवारी (दि. ६) दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
गोंदिया तालुक्यातील अर्जुनी येथील एक महाराज गेल्या सात वर्षांपासून पीडित महिलेच्या शेजारी असलेल्या एका घरी पूजापाठ करण्याकरिता येत होता. त्यामुळे हळूहळू त्याची ओळख पीडित महिलेसोबत झाली. या महिलेचा मुलगा चिडचिड्या स्वभावाचा असल्याने तिनेही या महाराजाकडून पूजापाठ करण्याचा बेत आखला.
गुरुवारी ठरल्याप्रमाणे महाराजाला पीडित महिलेने आपल्या घरी पूजेकरिता बोलाविले होते. दुपारी ३ नंतर पूजापाठ सुरू असताना या महाराजाने महिलेसोबत छेडखानी करीत अभद्र व्यवहार केला. हा प्रकार तिच्या पतीच्या लक्षात येताच त्याने महाराजाला घराबाहेर काढले. हळूहळू ही वार्ता गावात पसरली. गावकऱ्यांनी घटनास्थळी गोळा होत महाराजाला मारहाण केली. पीडित महिलेनेदेखील महाराजाला चपलेने चोप दिला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ अर्जुनी परिसरातच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यात चांगलाच व्हायरल झाला.
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नेमके काय घडले, याची शहानिशा केली. दोन्ही पक्षांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. यावेळी दोन्ही पक्षांनी पोलीस ठाण्याच्या फाटकासमोर आपसात समझोता केला. पीडित महिलेने तक्रार दाखल करणार नसल्याचे सांगितल्याने तक्रार नोंदवून घेतली नाही.