प्रियकरानेच केला शिंगाडे विकणाऱ्या प्रेयसीचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2021 15:58 IST2021-12-22T15:56:37+5:302021-12-22T15:58:52+5:30
बिंझली या गावात शिंगाडे विकणाऱ्या महिलेचा खून तिच्या प्रियकरानेच केल्याचे समोर आले आहे. तो तिच्याशी बळजबरी करण्याचा प्रयत्न करत होता. महिलेने याचा विरोध केला असता, त्याने तिच्याजवळ असलेल्या धारदार शस्त्राने तिचा खून केला.

प्रियकरानेच केला शिंगाडे विकणाऱ्या प्रेयसीचा खून
गोंदिया : सालेकसा तालुक्याच्या बिंजली येथील शिंगाडे विकणाऱ्या महिलेचा खून तिच्या प्रियकरानेच केला. त्या महिलेवर बळजबरी करण्याचा प्रियकर प्रयत्न करत होता. महिलेने याचा विरोध केला असता, प्रियकराने तिच्याजवळच असलेल्या धारदार शस्त्राने गळ्यावर मारून तिचा खून केला. इंंद्रकला गुलाब दुधबर्वे (५२, रा. बिंजली) असे मृत महिलेचे नाव आहे.
२१ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होती. त्यामुळे सर्व लोक मतदानासाठी गेले असताना मतदान केल्यानंतर इंंद्रकला गुलाब दुधबर्वे (५२) ही पिपरटोला धानोली या गावात शिंगाडे विकायला गेली होती. शिंगाडे विकून परतत असताना तिला वाटेत अडवून आरोपी बाबुलाल गोबरी ढेकवार (५५, रा. बिंजली) याने तिच्याशी बळजबरी करण्याच्या प्रयत्न केला. याला तिने विरोध करताच आरोपीने तिच्या हातातील शिंगाडे कापण्यासाठी असलेल्या धारदार शस्त्राने हल्ला करून तिला ठार केले.
आरोपी बाबुलाल ढेकवार याला सालेकसा पोलिसांनी अटक केली. मागील पाच वर्षांपासून तिच्याशी बाबुलालचे अनैतिक संबंध होते. या संबंधांतूनच त्याने खून केल्याचे म्हटले आहे. सालेकसा पोलिसांनी आरोपीविरूद्ध भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.