कॉलेजचे स्वप्न बघतानाच काळाची ‘तिच्या’वर झडप
By Admin | Updated: July 11, 2016 01:42 IST2016-07-11T01:42:25+5:302016-07-11T01:42:25+5:30
तालुक्यातील चांदसूरज गावात चारपाच दिवसांपूर्वी अनिता राऊत (यादव) या १६ वर्षीय मुलीचा विषारी सापाच्या दंशामुळे करूण अंत झाला.

कॉलेजचे स्वप्न बघतानाच काळाची ‘तिच्या’वर झडप
गावात शोककळा : अनिताच्या मृत्यूने आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
विजय मानकर सालेकसा
तालुक्यातील चांदसूरज गावात चारपाच दिवसांपूर्वी अनिता राऊत (यादव) या १६ वर्षीय मुलीचा विषारी सापाच्या दंशामुळे करूण अंत झाला. तिचे आई-वडील मुलीविना पोरके झाले. अनिताच्या मृत्यूमुळे अख्खे गाव हादरून गेले. त्या विषारी सापाच्या शोधात सतत चार दिवस गावकरी झोपले नाही. पुढे आणखी अशा घटना घडू नये याची चिंता ग्रामस्थांना सतावत होती. मात्र दहावी उत्तीर्ण झालेल्या व कॉलेजमध्ये शिकण्याचे स्वप्न बघणाऱ्या अनितावर काळाने झडप घातली व तिची जीवनयात्रा संपली.
घरात अठराविश्वे दारिद्र्य. आई-वडील मोलमजुरी करून कुटुंबाची जबाबदारी सांभाळायचे. शरीराला पौष्टीक आहार नाही. अंगावर चांगले कपडे नाही अन् राहायला पुरेसे घर नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीतही अनिताने दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. परीक्षेत यश मिळाल्याने तिचा उत्साह द्विगुणीत झाला होता. पुढील शिक्षण तालुक्याच्या चांगल्या कॉलेजमध्ये व्हावे म्हणून तिने आई-वडिलांना समजूतही घातली होती व ११ वीत प्रवेश घेतला होता. घरापासून २२ किमीपेक्षा जास्त अंतरावर असलेल्या कॉलेजपर्यंत जाण्यासाठी आपल्याकडे सोय करून देण्याची क्षमता नाही. मुलगी कशी कॉलेजला जाईल, असा विचार सारखे आई-वडील करायचे. परंतु अनिताची शिक्षण घेण्याची तीव्र उत्कंठा होती. त्यामुळे तिने निर्धार केला होता की, कसेही आपण कॉलेजला शिकायला जाणार. परंतु कॉलेजला जाण्याचे स्वप्न बघत असतानाच काळाने घात केला. स्वत:सह कुटुंबाचे भविष्य साधण्यापूर्वीच अनिता कुटुंबासाठी आता भूतकाळ बणून राहिली.
सीमेपलिकडे बोरतलाव (छ.ग.) येथील आठवडी बाजार करून अनिताची आई फूलमत यादव घरी परतल्या. तेवढ्यात वडीलही मजुरी करून घरी आले. संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास अनिता रात्री स्वयंपाक करण्याच्या तयारीत होती. आईने बाजारातून आणूण दिलेला खाऊ ती खात होती. खाऊ खातखात ती चूल पेटविण्यासाठी काड्या आणण्यास अंगणालगतच्या खोलीत गेली. तिथे काड्या काढायला हात पुढे केले असतानाच विषारी नाग सापाने जबरदस्त दंश केला. तिने परत येवून आपल्या आई-वडिलांना काही तरी तिच्या हाताला चोराने चावल्याचे सांगितले व तिला भोवळ येवू लागली.
त्या ठिकाणी शोध घेण्यासाठी गेले. पण काही दिसले नाही. तेथून संपूर्ण काड्या हटविण्यात आल्या. परंतु साप पसार झाला होता. तिला औषधोपचार करण्यासाठी मोटार सायकलने दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तोपर्यंत सर्पदंशास एक तासापेक्षा अधिक काळ लोटला होता. अंगात झपाट्याने विष पसरत होते. दरेकसा येथे इंजेक्शन व सलाईन लावून तिला रेफर करण्यात आले. मात्र विषाची तीव्रता ती सहन करू शकली नाही. सालेकसा वाटेवर दोन किमी पुढे जात असतानाच अनिताची प्राणज्योत विझली. तिच्या मृत्यूमुळे कुटुंबाला तर मोठा धक्का बसलाच, पण या घटनेमुळे गावासह संपूर्ण परिसर हादरले. दुसऱ्या दिवसी तिचा अंत्यसंस्कार करण्यात आला.
दरम्यान त्या विषारी सापाचा शोध घेण सुरूच होते. तीन दिवस सतत कुटुंबातील लोक झोपू शकले नाही. तसेच या धक्क्यातून गावकरीसुद्धा सावरले नाही. चौथ्या दिवसी त्याच घरी झोपण्याच्या खोलीलगत नाग साप डोलताना आढळला. त्याला मारण्यात आले. तो तीव्र विषारी गव्हा नाग गळद तांबड्या रंगाचा होता.
ढिसाळ आरोग्य सेवेमुळे सर्पदंशाचे तीन बळी
घनदाट जंगलाने व्यापलेल्या परिसरात चांदसूरज गाव असून या ठिकाणी विषारी जीवजंतूंचे विचरण मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे जंगलातील गावांत सर्पदंश, विंचूदंश यासारख्या घटना घडण्याची नेहमीच शक्यता असते. अशावेळी या परिसरात आरोग्याची काळजी घेणारी यंत्रणा नेहमीच सक्रिय असावी. परंतु याबाबत येथील लोकांचे मोठे दुर्देवच आहे. चांदसूरज गाव प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसामध्ये मोडत असून या गावासाठी उपकेंद्रसुद्धा दरेकसा येथेच आहे. दरेकसावरून चांदसूरजचे अंतर ८ किमी पेक्षा जास्त आहे. या गावात आरोग्य कर्मचारी क्वचितच येतात, असे तेथील ग्रामस्थांनी सांगितले. चांदसूरज, टोयागोंदी या गावांसाठी स्वतंत्र उपकेंद्र देण्यात यावे, अशी मागणी या वेळी सामाजिक कार्यकर्ते ओमप्रकाश लिल्हारे यांनी केली. मागील एका वर्षात सर्पदंशामुळे मृत्यूच्या तीन घटना घडल्या आहेत. या परिसरात अनेक जनावरेसुद्धा सर्पदंशाने बळी पडतात, अशी माहिती त्यांनी या वेळी दिली.
लोकमत चमू जीरो ग्राऊंडवर
घटनेची सखोल व अचूक माहिती मिळावी म्हणून लोकमत चमूने चांदसूरज या गावी जावून पीडित कुटुंबाच्या घरी जाऊन घटनेची माहिती जाणूण घेण्याचा प्रयत्न केला. सालेकसा-डोंगरगड मार्गावर असलेला चांदसूरज गाव छत्तीसगड-महाराष्ट्राच्या सीमेवर असून मुख्य वस्तीत जाण्यासाठी सीमेजवळून एक किमी आत उत्तरेकडे प्रवेश करावे लागते. त्या गावापर्यंत पक्के रस्ते नसून रेल्वे लाईन ओलांडून किंवा पुलाखालून ये-जा करावी लागते. पावसाळ्यात चारचाकी वाहने पोहचू शकत नाही. मोटारसायकलने त्या गावी गेल्यावर असे दिसले की, डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या गावात छत्तीसगडचा प्रभाव जास्त आहे. मुलीचे वडील संतुराम यादव एका लहान खोलीत कुटुंबासह राहत असून बाजूला एक कोणतेही दार नसलेली खोली आहे. ती खोली वाडीला लागून आहे. तिथे स्वयंपाकासाठी काड्या ठेवण्यात आल्या होत्या. दिवसरात्र मोलमजुरी करून अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत सोयींसाठी संघर्ष करण्यातच संतू यादव आणि त्यांची पत्नी फुलमत यादव अडकूण असल्याचे दिसून आले.