लॉकडाऊनचा बारदाना निर्मिती उद्योगाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 03:36 PM2020-06-08T15:36:16+5:302020-06-08T15:38:23+5:30

देशभरात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने मागील तीन महिन्यापासून सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी आहे. परिणामी उद्योगधंदे ठप्प पडले आहेत. याचाच फटका कलकत्ता येथील बारदाना निर्मिती करणाऱ्या जूट महामंडळाला बसला आहे.

Lockdown hits gunny bag manufacturing industry | लॉकडाऊनचा बारदाना निर्मिती उद्योगाला फटका

लॉकडाऊनचा बारदाना निर्मिती उद्योगाला फटका

Next
ठळक मुद्देविदर्भात बारदान्याचा तुटवडा शासकीय धान खरेदी संकटात

अंकुश गुंडावार।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : देशभरात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने मागील तीन महिन्यापासून सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी आहे. परिणामी उद्योगधंदे ठप्प पडले आहेत. याचाच फटका कलकत्ता येथील बारदाना निर्मिती करणाऱ्या जूट महामंडळाला बसला आहे. बारदाना तयार करण्यासाठी मजूर मिळत नसल्याने मागील तीन महिन्यापासून महाराष्ट्रासह इतर राज्यांना बारदाना मिळणे कठीण झाले आहे. याचा फटका विदर्भात सुरू असलेल्या शासकीय धान खरेदी केंद्राना बसला असून बारदान्याअभावी धान खरेदी आणि धानाची भरडाई करुन तयार केलेला तांदूळ ठेवण्याची समस्या निर्माण झाली आहे.
पूर्व विदर्भात सध्या जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत हमीभावानुसार शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जात आहे. मात्र अनेक केंद्रांना बारदान्याचा पुरवठा झाला नसल्याने धान खरेदीची अडचण निर्माण झाली आहे.विदर्भात सध्या धान आणि इतर वस्तूंची खरेदी करण्यासाठी १ कोटी बारदान्याची आवश्यकता आहे. मात्र बारदान्याचा शासनाकडून पुरवठा होत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांना कलकत्ता येथील जूट महामंडळाच्या माध्यमातून बारदान्याचा पुरवठा केला जातो. पण कोरोनामुळे मागील तीन महिन्यापासून देशभरात सर्वत्र लॉकडाऊन आहे. त्यामुळे याचाच फटका कलकत्ता येथील बारदान्याचा पुरवठा करणाºया कलकत्ता येथील जूट महामंडळाला बसला आहे. सध्या महाराष्ट्रासह इतर राज्यांकडून बारदान्याची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. पण मजुरांअभावी बारदाना तयार करणे बंद असल्याने पुरवठा होत नसल्याची माहिती आहे. पूर्व विदर्भात रब्बी हंगामात शासकीय धान खरेदी केली जाते. मात्र सध्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची धानाची विक्री करण्यासाठी गर्दी वाढली असताना बारदाना नसल्याने धान खरेदी करण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांसाठी ४० लाख तर उर्वरित जिल्ह्यांसाठी ६० लाख अशा एकूण कोटी बारदान्याची गरज आहे.पण पुरवठ्याअभावी तुटवडा निर्माण झाला असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.पावसाळ्याला सुरूवात झाली असून ३० जूनपर्यंत रब्बीतील धान खरेदी केली जाणार आहे. त्यामुळे लवकर बारदाना उपलब्ध न झाल्यास बारदान्याअभावी शेतकरी आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनची कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे.

जुन्या बारदान्यासाठी निविदा
कलकत्ता येथील जूट महामंडळाकडून बारदान्याचा पुरवठा होत नसल्याने शासनाने यावर तोडगा काढण्यासाठी एकदा वापरलेला बारदान्यासाठी निविदा मागविल्या आहे. यामाध्यामातून जूना बारदाना उपलब्ध झाल्यास धानाची खरेदीची अडचण मार्गी लागू शकते. यासाठी शासनाने निविदा मागविल्या असल्याची माहिती मार्केटिंग फेडरेशनच्या सूत्रांनी दिली.

भरडाई केलेला तांदूळ परत करण्याची समस्या
शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात आलेला धानाची राईस मिलर्सशी करार करुन भरडाई केली जाते. यासाठी शासनाकडून बारदाना उपलब्ध करुन दिला जातो. मात्र आता राईस मिलर्सनी भरडाई केलेला तांदूळ शासनाकडे जमा करण्यासाठी बारदान्याची अडचण निर्माण झाली आहे. यासाठी त्यांना जुन्या बारदाना घेवून त्यात तांदूळ परत करण्याचे निर्देश दिले आहे. पण हा जूना बारदाना आणायचा कुठून असा प्रश्न राईस मिलर्ससमोर निर्माण झाला आहे.

स्वस्त धान्य दुकानांची मदत
राईस मिलर्स धानाची भरडाई करुन शासनाकडे सीएमआर तांदूळ जमा करतात. त्यानंतर हा तांदूळ जिल्हा पुरवठा विभागाच्या माध्यमातून स्वस्त धान्य दुकानांना पुरवठा केला जातो. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांकडे पुरवठा केलेल्या तांदळाचा बारदाना असून आता तो त्यांच्याकडून खरेदी करुन बारदाना टंचाईवर मार्ग काढला जात आहे.

Web Title: Lockdown hits gunny bag manufacturing industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.