साकरीटोला घाट ठरतेय पिंडदानाचे स्थळ
By Admin | Updated: November 4, 2014 22:42 IST2014-11-04T22:42:30+5:302014-11-04T22:42:30+5:30
सालेकसा-आमगाव आणि लांजी (म.प्र.) या तिन्ही तालुक्यांच्या एकत्रित टोकावर असलेला साकरीटोला घाट हा उत्तरवाहिनी वाघ नदीच्या किनाऱ्यावर असून तिन्ही तालुक्यातील लोकांसाठी मिनी प्रयागराज

साकरीटोला घाट ठरतेय पिंडदानाचे स्थळ
विजय मानकर - सालेकसा
सालेकसा-आमगाव आणि लांजी (म.प्र.) या तिन्ही तालुक्यांच्या एकत्रित टोकावर असलेला साकरीटोला घाट हा उत्तरवाहिनी वाघ नदीच्या किनाऱ्यावर असून तिन्ही तालुक्यातील लोकांसाठी मिनी प्रयागराज म्हणून नावारूपास येत आहे. या ठिकाणी वर्षभर मृताच्या कुटुंबातील लोक अस्थिविसर्जन, पिंडदान व मुंडण संस्कार धार्मिक परंपरेनुसार करीत असतात. त्यामुळे या स्थळाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
सालेकसा तालुक्याच्या साकरीटोला (झालिया) या गावाजवळ वाघनदीच्या पूर्व किनाऱ्यावर साकरीटोला परिसरालगत असल्यामुळे या स्थळाला साकरीटोला घाट असे नाव देण्यात आले आहे. पश्चिमी किनाऱ्याच्या जवळच एक छोटा नाला वाघ नदीला येवून मिळतो. त्या नाल्याच्या पलीकडे उत्तरेत लांजी (म.प्र.) तालुका लागलेला आहे. त्यामुळे हे स्थळ तीन तालुक्यांच्या संगमावर तसेच वाघनदी आणि नाल्याच्या दुमल्यावर स्थापित आहे. त्याचप्रकारे या ठिकाणी नदीचा प्रवाह उत्तर दिशेकडे असल्याने शास्त्रानुसार अशा स्थळाला विशेष महत्व असते. त्यामुळ्य साकरीटोला घाटाचे महत्व दिवसेंदिवस वाढत आहे.
आधी इलाहाबाद, मंडला, रामटेक यासारख्या स्थळावर जाऊन पिंडदान करणारे लोक आता याच ठिकाणाला प्रथम प्राधान्य देत आहेत. या ठिकाणाहून वाहणारी वाघ नदी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी असून या नदीचे स्त्रोत सिरपूर धरणातून असल्याने ही नदी वर्षभर प्रवाहित होत असते. अस्थी विसर्जनासाठी वाहत्या पाण्याला अधिक महत्व दिले जाते. याचे कारण म्हणजे वाहत्या पाण्यात अस्थी विसर्जन केल्यास मृतात्म्याला वैकुंठ प्राप्त होते, अशी धार्मिक मान्यता आहे.
त्यामुळे लोक या ठिकाणी अस्थी विसर्जनासाठी बहुसंख्येने येतात. त्याचप्रकारे हिरवीगार वनराई, छायादार वृक्ष, निसर्गरम्य वातावरण, स्वच्छ परिसर, प्रदूषणमुक्त घाट व इतर आकर्षक वैशिष्ट्यांमुळे हे स्थळ नेहमी प्रत्येकाला आकर्षित करीत असते. त्यामुळे येथे येणारे भाविक दुसऱ्यालाही येण्यास प्रभावित करतात.
त्याचबरोबर उन्हाळा, पावसाळा व हिवाळ्याचा विचार करता या ठिकाणी राहण्यासाठी, विश्रांती घेण्यासाठी, स्वयंपाक करण्यासाठी, जेवणावळी लावण्यासाठी पुरेशा जागेची व्यवस्था व निवाऱ्याची सोय आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना कोणतीच गैरसोय होत नाही.
हे स्थळ सालेकसा-आमगाव मुख्य मार्गावर असून लांजीकडून येणारा मुख्य मार्ग याच ठिकाणी मिळतो. या सर्व मार्गावरून नेहमी एसटी बस, टॅक्सी आदी प्रवासी वाहने व इतर वाहने धावत असतात. या स्थळाचे अंतर आमगावपासून तीन किमी, सालेकसा पासून १२ किमी व लांजीपासून २५ किमी असून तिन्ही मार्गावर ये-जा करण्यास कोणतीही अडचण भासत नाही. या स्थळाचे आकर्षण वाढल्याने या ठिकाणी गरीब, श्रीमंत व सर्व प्रकारचे भाविक येत असतात. यात काही टॅक्सीने तर काही स्वत:च्या वाहनाने किंवा भाड्याच्या चारचाकी वाहनाने येतात. त्यांची वर्षभर रेलचेल सुरू असते.
अनेक वर्षापूर्वी चेंडूगिरी महाराज नावाच्या संताने या ठिकाणी आपले ठाण मांडले होते. त्यानंतर या ठिकाणी तळघर तयार करून तेथे देवनगरी स्थापित करण्यात आली होती. या देवनगरीत भगवान शंकर, देवी पार्वती यांच्यासह विविध हिंदू देवतांच्या मूर्त्या स्थापित करण्यात आल्या होत्या. त्या मूर्त्यांच्या दर्शनासाठी भाविकांना एका मार्गाने तळघरात प्रवेश करीत देवांचे दर्शन घेत दुसऱ्या मार्गाने बोगद्याबाहेर यावे लागते.
यावेळी एक वेगळा अनुभव प्रत्येकाला होत असते. याशिवाय या परिसरात आता वेगवेगळ्या देवी-देवतांचे तसेच निसर्गाशी समतोल राखणाऱ्या प्राण्यांचे मूर्त्या व मंदिरे देवस्वरूपात स्थापित झाल्या आहे. त्यामुळे या स्थळाला काही लोक शिवनगरी तर काही लोक देवनगरी म्हणून ओळखतात. मात्र अस्थी विसर्जन व पिंडदानाचे कार्यक्रम वाढत असल्यापासून या स्थळाची प्रसिध्दी ‘साकरीटोला घाट’ या नावाने सर्वदूर झालेली आहे.
काही वर्षापूर्वी आमगावचे शिक्षण महर्षी व माजी खासदार स्व. लक्ष्मणराव मानकर या स्थळाला नेहमी भेट देत होते. ते आपल्या सहकाऱ्यांसोबत या ठिकाणी येवून चिंतन-मनन करीत होते, असे बोलले जात आहे. त्यांच्या प्रेरणेवरून या स्थळाकडे आणखी जास्त लक्ष केंद्रीत करण्यात आले. त्यानंतर त्यांचे पुत्र माजी आ. केशवराव मानकर यांनी या ठिकाणासाठी निधी उपलब्ध करून दिला. तसेच इतर लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने या स्थळी भाविकांसाठी पुरेशा निवाऱ्यांची सोय उपलब्ध करून दिली.
या स्थळाची दिवसेंदिवस प्रसिध्दी वाढत असून येणाऱ्या भाविक कुटुंबांची संख्यासुध्दा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या स्थळाला व परिसराला स्वच्छ, आकर्षक व निसर्गपूरक बनवून ठेवण्यासाठी तसेच वाघनदीला प्रदूषणापासून दूर ठेवण्यासाठी मोठे आवाहन पेलण्याची गरज निर्माण होऊ शकते.
या ठिकाणी विविध कार्यासाठी येणाऱ्या भाविकांनी व सामान्य लोकांनी सहकार्य करण्याची गरज आहे.