काठीने वार, महिलेचा जीव घेणाऱ्याला आजन्म कारावास; विशेष सत्र न्यायालयाचा निकाल
By नरेश रहिले | Updated: December 5, 2023 19:17 IST2023-12-05T19:16:48+5:302023-12-05T19:17:00+5:30
५ हजाराचा दंडही ठोठावला, कुंपनावरून होता वाद

काठीने वार, महिलेचा जीव घेणाऱ्याला आजन्म कारावास; विशेष सत्र न्यायालयाचा निकाल
गोंदिया: तिरोडा तालुक्याच्या सुकडी येथील सायत्राबाई शालीकराम बर्वे यांचा २८ जून २०२१ रोजी खून करणाऱ्या आरोपीला गोंदियाच्या विशेष सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ही सुनावणी ४ डिसेंबर रोजी तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व विशेष सत्र न्यायाधीश एन.बी.लवटे यांनी केली आहे. आरोपी राजेश मारबते (३७) रा. सुकडी ता. तिरोडा याला आजन्म सश्रम कारावास व ५ हजार रूपये दंड ठोठावला आहे.
फिर्यादी बाबुलाल शालीकराम बर्वे व आरोपी नामे राजेश मारबते यांचे घर एकमेकांना लागूनच आहे. दोंघांचीही सांदवाडी घराचे मागील भागात आहे. २७ जून २०२१ रोजी आरोपी याने कुंपन फिर्यादीच्या जागेत लावल्याच्या करणावरून तोंडी भांडण झाले होते. या भांडणांचा राग मनात धरून आरोपीने दिनांक २८ जून रोजी सायत्राबाई बर्वे या बदक सोडण्यासाठी घराच्या मागच्या बाजूला गेल्या असता आरोपी राजेश मारबते याने काठीने तिच्या डोक्यावर मारून तिचा खून केला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सायत्राबाई यांना उपचाराकरिता उपजिल्हा रूग्णालय तिरोडा येथे नेले असता उपचारादरम्यान सायत्राचा मृत्यू झाला.
आरोपीविरूध्द तिरोडा पोलिस ठाण्यात भादंविच्या कलम ३०७, ३०२ अंतर्गत गुन्हा नोंद केला होता. तपास पोलीस उपनिरिक्षक अशोक केंद्रे यांनी केला होता. जिल्हा सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता महेश एस. चंदवानी यांनी एकुण ११ साक्षदारांची साक्ष न्यायालयासमोर नोंदवून घेतली. आरोपीचे वकील व सरकारी वकील यांच्या सविस्तर युक्तीवादानंतर तसेच कागदोपत्री पुरावा व वैद्यकीय अहवालाच्या आधारावर तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व विशेष सत्र न्यायाधीश एन. बी. लवटे यांनी आरोपीविरूद्र सरकारी पक्षाचा पुरावा ग्राहय धरून आरोपीला कलम ३०२ प्रमाणे आजन्म सश्रम कारावास व ५ हजार रूपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास ३ महिन्याचा अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली.