अपंगत्वावर मात करुन ओंकार ओढतो जीवनाचा गाडा
By Admin | Updated: August 9, 2015 01:51 IST2015-08-09T01:51:38+5:302015-08-09T01:51:38+5:30
मुनष्य जन्माला आला तेव्हा त्याचे सर्व अवयव चांगले असले तर त्याला संसाररुपी सागरात सुख प्राप्त होते.

अपंगत्वावर मात करुन ओंकार ओढतो जीवनाचा गाडा
स्वाभिमानाचे जगणे : शासनाच्या मदतीअभावी व्यवसायवृद्धी नाही
लोकमत प्रेरणावाट
मुरलीदास गोंडाणे इंदोरा (बु.)
मुनष्य जन्माला आला तेव्हा त्याचे सर्व अवयव चांगले असले तर त्याला संसाररुपी सागरात सुख प्राप्त होते. तो स्वत:च्या पायावर उभा राहुन कुठलेही कार्य करु कशतो. परंतु जन्मापासूनच अपंगत्व आले तर परावलंबी जीवन जगावे लागते. मात्र अपंगत्वाचा बाऊ करीत न बसता आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करणारा ओंकार स्वाभिमानाने जीवन जगत आहे.
तिरोडा तालुक्यातील एक छोटे गाव खैरलांजी येथील ओंकार दसाराम देवगडे (वय ५०) हे जन्मापासूनच दोन्ही पायांनी अपंग आहे. ढिवर समाजातील एका गरीब परिवारात त्यांचा १४ जुलै १९६४ ला जन्म झाला. जन्मानंतर आपला मुलगा चांगला धडधाकट होईल असा अंदाज त्यांच्या आई-वडिलांनी वर्तविला होता, मात्र जेव्हा ओंकार चालण्याच्या स्थितीत आला तेव्हापासूनच तो दोन्ही पायांनी अपंग झाला. तेव्हापासून तर आजपर्यंत तो आपल्या अपंगत्वावर मात करुन जीवन जगत आहे.
अपंगात्वाचे जीवन जगत असलेल्या ओंकार यांनी कधी धिर सोडला नाही. सदर प्रतिनिधीने त्यांच्या घरी जाऊन मनमोकळेपणाने गप्पा मारल्या तेव्हा त्यांनी आपली आपबिती सांगितली. ओंकार देवगडे जरी अपंग असले तरी त्यांनी स्वत:ला कमी समजले नाही. गावाच पुर्वी वर्ग १ ते ४ पर्यंत शाळा असताना त्यांनी गावातच चौथीपर्यंतचे शिक्षण घेतले. पुढचे शिक्षण परसवाडा येथे घेण्यासाठी वर्ग ५ वी मध्ये नाव दाखल झाले, मात्र घरची परिस्थिती व अपंगत्वामुळे पुढचे शिक्षण घेऊ शकले नाही.
दुर्गाबाईसोबत लग्नानंतर त्यांना चार मुले झाली. पण बाहेरचे काम जमत नाही म्हणून ते घरच्या घरीच राहू लागले. पत्नी दुर्गाबाई देवगडे वनमजुरी, शेतीचे काम, घराशेजारील लोकांचे घरची भांडी धुणे, पाणी भरणे अशी कामे करुन बांधकामावरही जाऊन परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहे. त्यांच्याकडे शेती नाही. पण केवळ पत्नीच्या कमाईवर न राहता ओंकारने गावातच छोटेसे दुकान लावले. त्यात लहान मुलांचा खाऊ, पानसुपारी विक्री करुन दररोज ५० ते १०० रुपयांचा धंदा ते करीत आहेत. ग्राम पंचायत द्वारे संजय गांधी निराधारचा फॉर्म भरला तेव्हा तहसील आॅफीसकडून ६०० रुपये अनुदान मिळने सुरु झाले.
अपंग असले तरी हरीनामाचा छंद मात्र त्यांच्या मनी आहे. सकाळ संध्याकाळ विठ्ठल रुक्मिनीची पुजा केल्याशिवाय होत नाही. कपाळी टिळा लावायलाच पाहिजे असे त्यांचे म्हणने आहे. लग्नाअगोदार त्यांनी पंढरपूरची वारी सुद्धा केली असे ते सांगतात. शासनाद्वारे अपंगाच्या योजनेतून मदत मिळाली तर आपला पानटपरीचा व्यवसाय करुन परिवाराचा उदरनिर्वाह अजून चांगल्या पद्धतीने करू, असा त्यांचा विश्वास आहे.
कोणाचेही कर्ज घेतले नाही
पत्नी व स्वत:च्या कमाईवर मुलींचे संगोपन करीत असल्याचे ते सांगतात. आतापर्यंत त्यांनी कोणत्याच बँकेचे कर्ज घेतले नाही. शासनाद्वारे २००९ मध्ये इंदिरा आवाज योजनेमधून घरकुल मिळाले. पण शासनाचा निधी कमी असल्यामुळे घराचे पुर्ण काम झाले नाही. अपंगाच्या योजनांचा लाभ अजुनपर्यंत मिळाला नाही.
मनोहरभाई पटेल अॅकेडमी गोंदिया यांनी घेतलेल्या शिबिरात अर्ज केला व मागच्या वर्षी त्यांना तीन चाकी सायकल मिळाली. दोन्ही पायांनी चालता येत नाही. सायकलवर बसून हातांनी सायकल चालवून तीन-चार किमी अंतर जाऊ शकतो. मात्र सोबत मुलीला न्यावे लागते, असे त्यांनी सांगितले.