२०० जणांच्या उपस्थितीत होऊ द्या शुभमंगल सावधान !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2022 05:00 IST2022-02-02T05:00:00+5:302022-02-02T05:00:08+5:30
कोरोनाचा ओमायक्रॉन हा विषाणू तेवढा धोकादायक नसून आता बाधितांची संख्याही कमी होताना दिसत असल्याने विवाह सोहळ्यांवरील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यात आता शासनाने विवाह सोहळ्यांसाठी ५० ऐवजी २०० जणांना परवानगी दिली आहे. या निर्णयानंतर बहुतांश वर-वधू पित्यांची सोय होणार असून त्यांना विवाह सोहळा थाटामाटात पार पाडता येणार आहे. यामुळे आता येत्या काळात विवाह सोहळ्यांना चांगलाच बहर येणार यात काही शंका वाटत नाही.

२०० जणांच्या उपस्थितीत होऊ द्या शुभमंगल सावधान !
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाची तिसरी लाट व झपाट्याने वाढत असलेला प्रादुर्भाव बघता राज्य शासनाने पुन्हा काही निर्बंध लावले आहेत. यामध्ये विवाह सोहळ्यांसाठी फक्त ५० जणांचीच परवानगी देण्यात आली होती. परिणामी एवढ्या मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाह सोहळा आटोपणे शक्य नसल्याने वर-वधू पित्यांची अडचण झाली होती. अशात कित्येकांना विवाह सोहळा पुढे ढकलावा लागला आहे. मात्र कोरोनाचा ओमायक्रॉन हा विषाणू तेवढा धोकादायक नसून आता बाधितांची संख्याही कमी होताना दिसत असल्याने विवाह सोहळ्यांवरील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यात आता शासनाने विवाह सोहळ्यांसाठी ५० ऐवजी २०० जणांना परवानगी दिली आहे. या निर्णयानंतर बहुतांश वर-वधू पित्यांची सोय होणार असून त्यांना विवाह सोहळा थाटामाटात पार पाडता येणार आहे. यामुळे आता येत्या काळात विवाह सोहळ्यांना चांगलाच बहर येणार यात काही शंका वाटत नाही.
मंगल कार्यालयांना दिलासा
शासनाने ५० जणांवरील निर्बंध हटवून त्यात २०० जणांची परवानगी दिली ही चांगली बाब आहे. मात्र यापेक्षा जास्त जणांची परवानगी अपेक्षित आहे. तरिही आता २०० जणांची उपस्थिती मिळाल्याने काही प्रमाणात विवाह सोहळे आटोपले जाणार असे अपेक्षित आहे.
- मनोज बिसेन (लॉन व्यवसायी)
शासनाने विवाह सोहळ्यांवरील निर्बंध शिथिल केले हा चांगला निर्णय आहे. मात्र २०० पेक्षा जास्त जणांची उपस्थिती देणे अपेक्षित आहे. कारण विवाह सोहळा एकदाच होत असून एवढ्या कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत तो उरकणे शक्य नाही. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
- कार्तिक चव्हाण (लॉन व्यवसायी)
मंगल कार्यालयात २५ टक्के अथवा २०० जण
शासनाने शिथिल केलेल्या या निर्बंधांनुसार आता मंगल कार्यालयात क्षमतेच्या २५ टक्के अथवा २०० जणांच्या उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे. सर्वसाधारण पणे एवढ्या लोकांच्या उपस्थितीत विवाह आटोपता येत असल्याने विवाह संख्या वाढणार असे दिसून येते.
फेब्रुवारीतील लग्नाचे मुहूर्त
फेब्रुवारी महिन्यात ५, ६,११,१२,१८,१९,२१, २२ तारखेला असे एकूण ८ विवाह मुहूर्त आहेत. त्यात आता २०० लोकांची परवानगी असल्याने विवाह सोहळे आटोपणार.