तलावातील पवनकांदे परराज्यात
By Admin | Updated: May 4, 2015 01:45 IST2015-05-04T01:45:55+5:302015-05-04T01:45:55+5:30
नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाच्या तलावातील पवनकांदे विक्रीवर बंदी असतानाही मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन सुरू आहे.

तलावातील पवनकांदे परराज्यात
संतोष बुकावन अर्जुनी मोरगाव
नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाच्या तलावातील पवनकांदे विक्रीवर बंदी असतानाही मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन सुरू आहे. या पवनकांद्यांना शहरात प्रचंड मागणी असून याची परराज्यात विक्री केली जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
प्राप्त माहितीनुसार, पवनकांदा ही वनस्पती नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाच्या तलावात मुबलक प्रमाणात आहे. ही वनस्पती राज्यात अत्यंत कमी तलावात दिसून येते. पवनकांदा हे देशी-विदेशी पक्ष्यांचे आवडते खाद्य आहे. या वनस्पतीच्या आकर्षणामुळे दरवर्षी या तलावात मोठ्या प्रमाणात विदेशी पक्षी येत असतात. शिवाय वनस्पतीच्या झाडाखाली सावली राहात असल्याने पक्षी उन्हाच्या कडाक्यातून बचावासाठी आश्रय घेतात. पूर्वी या तलावातील पवनकांदे व खस गवताचा लिलाव शासनातर्फे केला जात होता. मात्र पक्ष्यांचे खाद्य कायम राखण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागातर्फे ५ सप्टेंबर १९८५ रोजी पवनकांदे व खस गवताच्या विक्रीचे लिलाव बंद केले. लिलाव बंद होताच तलाव हे मोकळे रान झाले. यावर नियंत्रण राखण्यात प्रशासनाला अपयश आले.
तलावाशेजारी असलेल्या गावातील लोकांना हा अवैध असलेला उद्योग मिळाला. अनेक गावातील लोकांनी या उद्योगाला उदरनिर्वाहाचे साधन बनविले. उन्हाळ्यात तलावाच्या पाण्याची पातळी कमी होते ही पातळी कमी होताच पाण्यात असलेली ही वनस्पती कोरड्या जमिनीवर असते. या वनस्पतीखाली असलेला कंद म्हणजेच पवनकांदा होय. यासाठी लोक वनस्पती तोडून कंद काढण्यासाठी खोदकाम करतात. यामुळे तलाव परिसरात मोठमोठे खड्डे पडलेले दिसून येतात. खड्याच्या काठावरची माती तशीच पडून असते. पावसाळ्यात जंगलातून तलावाकडे येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे तलावात मातीचा थर वाढत जातो. वारंवार दरवर्षी होणाऱ्या या पद्धतीमुळे तलाव आणखीच बुजला आहे. तलाव बुजल्याने येथील पाण्याचा संचय कमी झाला आहे. या तलावाचे पाच गावांना सिंचनासाठी पाणी मिळते. तलाव बुजत चालल्याने सिंचनक्षमतेवरही परिणाम झाल्याचे दिसून येते. अशा प्रकारामुळे वनस्पती नष्ट होत आहे. त्यामुळे देशी-विदेशी पक्ष्यांचे आवागमन कमी झाले आहे. वन्यजीव विभागाचे दुर्लक्ष असल्याने पवनकांदे खोदकामाचे निमित्त सधून पक्ष्यांची शिकार सुद्धा केली जात असल्याचे बोलल्या जात आहे.
येलोडी, जांभळी, रामपुरी, रांजीटोला तसेच तलावाच्या शेजारी असलेल्या गावातील सुमारे ५०० ते ६०० लोकं दररोज पवनकांद्याच्या खोदकामात गुंतलेले असतात. दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हाच उद्योग सुरू असतो. कुटुंबातील मुलांपासून तर वृद्धांपर्यंत सारी मंडळी या व्यवसायात रममाण असते. प्रत्येक व्यक्ती दररोज सुमारे ७०० ते ८०० रुपये कमावतो. यामुळेच परिसरात रोजगार हमी योजना, घरकुल योजना व शेती कामासाठी मजूरवर्ग सापडत नाही.
काही कुटुंबातील लोक स्वत:च हा उद्योग करतात तर काही लोक गुत्तेदार बनली आहेत. गुत्तेदार लोक इतरांकडून कमी भावाने हे पवनकांदे खरेदी करतात. त्यांची साठवणूक करुन हा माल चारचाकी वाहनातून पुढे पाठवतात. काही लोक स्वत:च आजूबाजूच्या परिसरात जाऊन स्वत: विक्री करतात. काही गुत्तेदार हे रात्री स्वत:च्या दुचाकीने देवरी येथे जावून विक्री करतात. धाबेपवनीनंतर बोदराई फाटा आहे. या फाट्याजवळून एक कालवा जातो. कालव्याजवळून जाणाऱ्या रस्त्याने ही चोरटी वाहतूक केली जाते. हा रस्ता पुढे धाबेपवनी-चिचगड रस्त्याला मिळतो. याच मार्गाने देवरीकडे प्रयाण केले जाते. पवन कांद्यांची भाजी तयार केली जाते. विशेषत: सिंधी बांधव भाजीसाठी पवनकांद्याची मागणी करतात. स्थानिक लोकं देवरीपर्यंत हा माल सोडून देतात. देवरीत व्यापारी बसलेले असतात हे व्यापारी छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव, भिलाई, दुर्ग, गोंदिया, नागपूर, वडसा येथील बाजारपेठेत हा पवनकांदा पाठवितात. त्याठिकाणी या कांद्याला ७० ते ८० रुपये किलोप्रमाणे दर मिळतो. या प्रकारावर प्रतिबंध घालणे काळाची गरज आहे.