चार दिवसात सुरू होणार गोंदिया येथील प्रयोगशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 05:00 IST2020-05-28T05:00:00+5:302020-05-28T05:00:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने स्वॅब नमुने तपासणीची प्रयोगशाळा नसल्याने ते तपासणीसाठी ...

The laboratory at Gondia will start in four days | चार दिवसात सुरू होणार गोंदिया येथील प्रयोगशाळा

चार दिवसात सुरू होणार गोंदिया येथील प्रयोगशाळा

ठळक मुद्देस्वॅब नमुने पाठविण्याची अडचण दूर : दोन दिवस घेणार ट्रायल चाचणी

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने स्वॅब नमुने तपासणीची प्रयोगशाळा नसल्याने ते तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविले जात होते. परिणामी स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्राप्त होण्यास विलंब होत होता. मात्र ही अडचण दूर होणार असून चार दिवसात येथील प्रयोगशाळा सुरू होणार आहे.
गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे. मात्र येथे कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने स्वॅब नमुने तपासणी प्रयोगशाळा नव्हती. त्यामुळे येथील नमुने तपासणीकरिता नागपूर येथील मेयो आणि एम्सच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जात आहे. मात्र या दोन्ही प्रयोगशाळेत संपूर्ण विदर्भातून स्वॅब नमुने तपासणीसाठी येत असल्याने त्याचा अहवाल प्राप्त होण्यास विलंब होत होता. परिणामी रुग्णावर उपचार सुरू करण्यास उशीर होत होता. हीच बाब विचारात घेत खा. प्रफुल्ल पटेल यांनी गोंदिया येथे स्वॅब नमुने तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्याची मागणी शासनाकडे केली होती. त्यानंतर शासनाने याला हिरवी झेंडी दाखविली होती.
पालकमंत्री अनिल देशमुख यांनी सुध्दा प्रयोगशाळा उभारण्यासाठी डीपीडीसीतून निधी खर्च करण्यास मंजुरी दिली होती. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने स्वॅब नमुने तपासणीसाठी सिंगापूर येथून मशीन मागविण्यात आली.
आठ दिवसांपूर्वीच ही मशीन गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाली आहे. तसेच यासाठी प्रयोगशाळा सुध्दा सज्ज झाली आहे. सिंगापूरहून आलेल्या मशीनचे इन्स्ट्रॉलेशन सुध्दा पूर्ण झाले आहे. या मशिनवर गुरूवारी (दि.२८) आणि शुक्रवारी स्वॅब नमुन्यांची ट्रायल बेसवर चाचणी केली जाणार आहे. यासाठी नागपूर येथील तज्ज्ञांचे एक पथक गोंदिया येथे दाखल सुध्दा झाले आहे.
तज्ज्ञ दोन दिवस या मशीवर स्वॅब नमुन्यांची चाचणी घेणार आहेत. त्यानंतर सोमवारपासून गोंदिया जिल्ह्यातील स्वॅब नमुन्यांची तपासणी ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात होणार आहे. त्यामुळे स्वॅब नमुन्यांचा अहवाल उशीराने प्राप्त होण्याची समस्या दूर होणार आहे.

दररोज शंभर स्वॅब नमुन्यांची तपासणी शक्य
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने स्वॅब नमुने तपासणी प्रयोगशाळा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरू झाल्यानंतर एकाच दिवशी शंभर नमुने तपासणे शक्य होणार आहे. त्यामुळे स्वॅब नमुन्याचा अहवाल देखील त्वरीत प्राप्त होणार असून रूग्णावर त्वरीत उपचार सुरू करण्यास मदत होणार आहे.
स्वॅब नमुन्यांचा अहवाल वेटींगवर
गोंदिया येथील प्रयोगशाळा सुरू झाली नसल्याने सध्या स्वॅब नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जात आहे. मात्र येथून अहवाल प्राप्त होण्यास चार ते पाच दिवसांचा कालावधी लागत आहे. सध्या शंभरावर स्वॅब नमुन्यांचा अहवाल नागपूर येथील प्रयोगशाळेत प्रलबिंत आहे.

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने स्वॅब नमुने तपासणी प्रयोगशाळा सज्ज झाली आहे. दोन दिवस या प्रयोगशाळेत ट्रायल बेसवर तपासणी करुन पाहले जाणार आहे. त्यानंतर तज्ज्ञांकडून सर्व व्यवस्थीत असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर येथीलच प्रयोगशाळेत स्वॅब नमुने तपासणी केले जातील.
- व्ही.पी.रुखमोडे, अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया.

Web Title: The laboratory at Gondia will start in four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.