धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्या
By Admin | Updated: November 15, 2014 01:47 IST2014-11-15T01:47:51+5:302014-11-15T01:47:51+5:30
तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत दयनिय आहे. कधी अतिवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळ त्यात ...

धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्या
अर्जुनी/मोरगाव : तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत दयनिय आहे. कधी अतिवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळ त्यात धानावर किडींचा प्रादुर्भाव यामुळे धान उत्पादनावर विपरीत परिणाम होऊन शेतकरी डबघाईस येतो व शेतकरी कर्ज बजारी होऊन आत्महत्याकरीत आहेत. अर्जुनी/मोर तालुका हा धान उत्पादनाचा तालुका असल्याने विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांना नव्या सरकारने न्याय देण्याची मागणी तालुका काँग्रेस कमेटीच्यावतीने नायब तहसीलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
अर्जुनी/मोर तालुक्यात हलक्या व भारी धानाचे पिक निघने सुरु झाले असले तरी धानखरेदी हमीभाव केंद्र सुरु न झाल्याने पडक्या भावात शेतकऱ्यांना धान व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील खोकरी येथील चंदू निंबार्ते या ७० वर्षिय शेतकऱ्यांनी त्यांच्यावरील थकीत कर्ज व व्याज असे एकूण पाच लाख ३७ हजार ३७५ रूपयांच्या वसुलीची नोटीसपाहून ६ नोव्हेंबर रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली.
लोकप्रतिनिधींना त्यांच्या आत्महत्येची कल्पना देण्यात आली. परंतु कुणीही भेट दिली नाही. शेवटी काँग्रेस नेत्यांनी रेटा लावल्याने १० नोव्हेंबर रोजी आत्महत्येचा अहवाल तयार करुन तहसील कार्यालयाला सादर करण्यात आला. सदर शेतकऱ्यांची आत्महत्या म्हणून नोंद करुन मृतकावर असलेल्या कर्जाची योग्य विल्हेवाट लाऊन त्यांच्या कुटुंबास आत्महत्येच्या निकषानुसार सहकार्य देण्यात यावे. सदर गावात बऱ्याच शेतकऱ्यांना कर्ज वसुलीचे नोटीस बजावण्यात आल्याने गावात दहशत पसरली आहे.
धान उत्पादक शेतकरी अन्य शेतकऱ्यांच्या तुलनेत अत्यंत दुर्लक्षीत आहेत व वेळोवेळी येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीने कमी अधीक पावसाने सतत उत्पादनात घट होत असते. तसेच उत्पादीत मालाला योग्य भाव नाही. त्यामुळे दिवसेंदिवस शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावत आहे. तरी त्यांच्या उत्पादीत मालाला योग्य भाव व निवडणुकापुर्वी सतत सातबारा कोरा करण्याची चर्चा या दोन्ही बाबींवर गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. अन्यथा पश्चिम विदर्भासारखे आत्महत्येचे प्रमाण वाढल्याशिवाय राहणार नाही.
महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या हिताकरीता सर्वत्र कृषी उत्पन्न बाजार समित्या निर्माण झाल्या असून शासनाकडून कोट्यवधींची रक्कम तेथील सुविधांवर खर्च केली आहे. परंतु प्रत्यक्षात बाजार समितीच्या यार्डवर शेतमालाची खरेदी होताना दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव तर मिळत नाही. परंतु व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात फसगत होत आहे. बाजार समित्या आपली उद्दिष्टपुर्ती करीत नसल्याने अशा समित्या बरखास्त करुन प्रशासक नेमावे व बाजार समित्यांचा नुकताच होणारा राजकीय वापर थांबवावा.
राज्यात बऱ्याच वर्षांपासून हमी भाव केंद्र सुरु करुन त्यांचे मार्फत शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी करण्यात येत होती. परंतु सुरु हंगामात अजुनपर्यंत खरेदी केंद्र सुरु झाले नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. खाजगी व्यापारी त्यांचा गैरफायदा घेत आहेत. या सर्व समस्या तातडीने सोडविण्याच्या हेतुने तालुका काँग्रेस कमेटी तर्फे नायब तहसीलदार डडमल यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.
निवेदन देताना तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष भागवत नाकाडे, विशाखा साखरे, जगदीश मोहबंसी ललीतचंद्र राजाभोज, रुशी पुस्तोडे, सुरेंद्रकुमार ठवरे, कृष्णा शहारे, लिलाधर ताराम, बंसीधर लंजे, विालास गायकवाड, देवीदास साखरी, बब्बु भंडारी, मोरेवर सोनवाने, अरविंद पालिवाल व अन्य उपस्थित होते.