तिसऱ्या लाटेत जिल्ह्यात ४९९८ बाधितांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2022 05:00 IST2022-03-07T05:00:00+5:302022-03-07T05:00:07+5:30
आतापर्यंत कोरोनाच्या दोन लाट येऊन गेल्या असून तिसरी लाट ओसरत असली तरी काही प्रमाणात ती आहे अशीच स्थिती आहे. सध्या जिल्ह्यात तिसरी लाट ओसरली असून आत फक्त १-२ बाधितांचीच नोंद घेतली जात आहे. तिसरी लाट सर्दी, खोकला व तापावरच राहिली असून बाधित घरच्या घरीच ठणठणीत झाले व त्यामुळे खूपच कमी प्रमाणात रुग्ण भर्ती झाले यात शंका नाही.

तिसऱ्या लाटेत जिल्ह्यात ४९९८ बाधितांची नोंद
कपिल केकत
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनेही टेन्शन वाढविले होते व आता ती ओसरत आहे. १ जानेवारीपासून तिसऱ्या लाटेबाबत गणना सुरू करण्यात आली असून तेव्हापासून जिल्ह्यातील बाधितांची आकडेवारी बघितल्यास जिल्ह्यात आतापर्यंत ४९९८ बाधितांची नोंद घेण्यात आली आहे. यात बाधितांमध्ये पुरुषांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येत आहे.
आतापर्यंत कोरोनाच्या दोन लाट येऊन गेल्या असून तिसरी लाट ओसरत असली तरी काही प्रमाणात ती आहे अशीच स्थिती आहे. सध्या जिल्ह्यात तिसरी लाट ओसरली असून आत फक्त १-२ बाधितांचीच नोंद घेतली जात आहे. तिसरी लाट सर्दी, खोकला व तापावरच राहिली असून बाधित घरच्या घरीच ठणठणीत झाले व त्यामुळे खूपच कमी प्रमाणात रुग्ण भर्ती झाले यात शंका नाही. मात्र तिसऱ्या लाटेतही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बाधितांची भर पडली हे सुद्धा टाळता येणार नाही. ३ मार्च पर्यंतची आकडेवारी बघितल्यास जिल्ह्यात तब्बल ४९९८ बाधितांची नोंद घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे, तिसऱ्या लाटेत कोरोनाने सर्वाधिक पुरुषांना झपाटले असून २७९९ त्यांची संख्या आहे. तर २१५६ महिलांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसते. आता कोरोनाची लाट ओसरली असून जिल्हा कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहे. मात्र जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात तिसऱ्या लाटेने नक्कीच जिल्हावासीयांचे टेन्शन वाढविले होते. यात काहीच शंका नाही.
७६ टक्के बाधित १८-६० वयोगटातील
n तिसऱ्या लाटेतील बाधितांची संख्या जाणून घेतली असता ४९९८ बाधितांची नोंद घेण्यात आली आहे. मात्र यामध्ये सर्वाधिक बाधित १८-६० वयोगटातील असल्याचे दिसत आहे. या वयोगटातील ३७८६ नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती व त्यांची ७५.७५ एवढी टक्केवारी आहे. विशेष म्हणजे,या लाटेत चिमुकल्यांना धोका राहणार असे सांगितले जात असतानाच जिल्ह्यात ०-५ वयोगटातील ३९ चिमुकल्यांची नोंद घेण्यात आली असून त्यांची ०.७८ एवढी टक्केवारी आहे.
१२ मृत्यूंची नोंद
- तिसऱ्या लाटेच्या १ जानेवारी ते ३ मार्चपर्यंतच्या कालावधीत १२ मृत्यूंची नोंद घेण्यात आली आहे. मात्र, मरण पावलेल्या या रुग्णांना सहव्याधी असल्याने त्यांचा मृत्यू झाला असून, त्यानंतर त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले जात आहे. यामुळे मृत्यू कोरोनामुळे झाला हेच समजले जात असून, मृतांचा आकडा वाढला आहे.
२५ जानेवारी धोक्याची
- तिसऱ्या लाटेत जानेवारी महिन्यातच सर्वात जास्त कहर दिसून आला व त्यानंतर फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यानंतर लाट ओसरताना दिसली. मात्र, जानेवारी महिन्यातील ३ दिवस सर्वाधिक धोक्याचे दिसून आले. कारण या ३ दिवसांतच सर्वाधिक बाधितांची नोंद घेण्यात आली आहे. यात २१ जानेवारी रोजी ३६३ बाधित, २२ जानेवारी रोजी ३२० बाधित, तर २५ जानेवारी रोजी सर्वाधिक ३६४ बाधितांची नोंद घेण्यात आली आहे. यामुळेच २५ जानेवारी हा दिवस सर्वाधिक धोक्याचा ठरला, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.