तातडीने द्या धानाचे बोनस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 06:00 IST2020-03-20T06:00:00+5:302020-03-20T06:00:11+5:30
शासनाने सर्वसाधारण धानाला १८१५ तर उच्च प्रतिच्या धानाला १८३५ रुपये असा दर ठरवून ५० क्विंटलची अट घालून सरसकट ७०० रुपये बोनस मिळणार असे जाहीर केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना धान न देता आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या ग्राम मसरामटोला, दल्ली व डोंगरगाव येथील धान खरेदी केंद्रात धान विकले. याला जवळपास ३ महिन्यांचा कालावधी लोटला.

तातडीने द्या धानाचे बोनस
लोकमत न्यूज नेटवर्क
शेंडा (कोयलारी) : सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम मसरामटोला (कोयलारी), दल्ली (रेंगेपार) व डोंगरगाव (सडक) येथील धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी ३ महिन्यांपूर्वी धान विकले होते. मात्र अद्यापही त्या धानाच्या बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली नाही. अनेक शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे लग्न जुळलेले आहेत. तर काहींची उसनवारी देणे बाकी आहे. त्याकरिता पैशांची नितांत गरज असून बोनस त्वरीत द्यावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
शासनाने सर्वसाधारण धानाला १८१५ तर उच्च प्रतिच्या धानाला १८३५ रुपये असा दर ठरवून ५० क्विंटलची अट घालून सरसकट ७०० रुपये बोनस मिळणार असे जाहीर केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना धान न देता आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या ग्राम मसरामटोला, दल्ली व डोंगरगाव येथील धान खरेदी केंद्रात धान विकले. याला जवळपास ३ महिन्यांचा कालावधी लोटला. मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बोनसची रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.
बोनसची रक्कम मिळेल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या मुला-मुलींचे लग्न जोडून टाकले. मार्च व एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात लग्नसराई असल्याने शेतकऱ्यांना पैशाची नितांत गरज आहे. तर काहींची उसनवारी देणे बाकी असून याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. वेळेवर पैसे मिळाले नाही तर सावकारांच्या दारात उभे राहण्याची पाळी येईल. या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. विक्री केलेल्या धानाच्या रक्कमेसोबत जर बोनसची रक्कम मिळाली असती तर असा प्रसंग उद्भवलाच नसता असे शेतकरी बोलत आहेत.
या समस्येकडे लोकप्रतिनिधी तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी काळजीने लक्ष पुरवून त्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बोनसची रक्कम जमा करावी अशी एकमुखी मागणी शेतकºयांनी केली आहे.