२५ वर्षांपासून खमाटा बायपास रस्त्याची उपेक्षा
By Admin | Updated: January 28, 2015 23:36 IST2015-01-28T23:36:06+5:302015-01-28T23:36:06+5:30
गोंदिया-भंडारा या दोन जिल्ह्याला जोडणारा बहुचर्चीत खमाटा मार्ग कोसमतोंडीजवळ अडलेला आहे. कोसमतोंडीच्या बाहेरुन जाणारा प्रस्तावित असलेल्या खमाटा मार्गाची मागील २५ वर्षापासून उपेक्षा होत आहे.

२५ वर्षांपासून खमाटा बायपास रस्त्याची उपेक्षा
कोसमतोंडी : गोंदिया-भंडारा या दोन जिल्ह्याला जोडणारा बहुचर्चीत खमाटा मार्ग कोसमतोंडीजवळ अडलेला आहे. कोसमतोंडीच्या बाहेरुन जाणारा प्रस्तावित असलेल्या खमाटा मार्गाची मागील २५ वर्षापासून उपेक्षा होत आहे.
या मार्गावर कोसमतोंडी जवळील नाल्यावर दीर्घ प्रतिक्षेनंतर पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहनाची वर्दळ वाढलेली आहे. परंतु कोसमतोंडीच्या बाहेरुन जाणाऱ्या खमाटा बायपासचे काम का अडलेले आहे असा प्रश्न या परिसरातील जनतेला पडलेला आहे. शासनाने या रस्त्याच्या बांधकामासाठी कोट्यवधी रुपये दिले होते. परंतु अजूनपर्यंत या रस्त्याचे बांधकाम प्रत्यक्षात पूर्ण झाले नाही. त्यामुळे हा रस्ता अधिकारी व राजकीय पदाधिकारी मिळून कागदावरच तर पूर्ण केला नाही ना, अशी शंका जनतेकडून व्यक्त केल्या जात आहे.
२५ वर्षापूर्वी खमाटा बायपास रस्त्याचा आराखडा कोसमतोंडी गावाच्या बाहेरुन प्रस्तावित करण्यात आला. याला संबंधित विभागाची मंजुरीही मिळाली. काही ठिकाणी नालीचे काम पण झाले. त्यानंतर मात्र काही शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला. खरे पाहता या रस्त्याच्या कामात ज्या शेतकऱ्यांची जमीन अधिगृहित करण्यात आली त्यांना शासनाकडून मोबदला मिळाला आहे. जमीन हस्तांतरणाची प्रक्रियाही पूर्ण झाली. मात्र प्रत्यक्ष कामाला अद्यापही सुरुवात झालेली नाही. त्यामुळे पावणी मुरते कुठे? असा प्रश्न कोसमतोंडी परिसरातील जनतेसमोर आहे.
बायपास रस्त्याअभावी जड वाहनेसुद्धा गावातून जातात. त्यामुळे लहान मोठे अपघात नेहमीच घडत असतात. सतत वाढत असलेल्या वाहनाच्या वर्दळीमुळे ग्रामपंचायतच्या नाल्यांचे मोठे नुकसान होत आहे व वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. आठवडी बाजाराच्या दिवशी बस गावाबाहेरच थांबते. त्यामुळे प्रवाशांना पायी चालत गावात यावे लागते. धानोरी, लेंडेझरी व मुरपार येथे बस जातच नाही.
त्यामुळे येथील प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. तीन वर्षापूर्वी या रस्त्याच्या वाहनांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानंतर प्रत्यक्षात काम सुरू करण्यात येत असल्याचा दावा संबंधित विभागाकडून करण्यात आला. मात्र अजूनपर्यंत या रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे सदर बायपास कधी पूर्ण होणार अशा प्रश्न येथील जनतेला पडलेला आहे. (वार्ताहर)