पाण्याअभावी शेकडो एकरातील पीक धोक्यात

By Admin | Updated: October 11, 2014 01:49 IST2014-10-11T01:49:23+5:302014-10-11T01:49:23+5:30

तालुक्यातील झालिया परिसरात साकरीटोला गावाकडे नहराचे पाणी जात नसल्याने येथील शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमिनीतील धानाचे पीक धोक्यात सापडले आहे.

Hundreds of single-crop crop risks due to water scarcity | पाण्याअभावी शेकडो एकरातील पीक धोक्यात

पाण्याअभावी शेकडो एकरातील पीक धोक्यात

सालेकसा : तालुक्यातील झालिया परिसरात साकरीटोला गावाकडे नहराचे पाणी जात नसल्याने येथील शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमिनीतील धानाचे पीक धोक्यात सापडले आहे. एकीकडे लाख मोलाचे पाणी नहराच्या दुरुस्ती अभावी नाल्यात व नदीत वाहून जात आहे. तर दुसरीकडे हक्काचे पाणी त्या शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे धानाचे पीक सुकण्याच्या मार्गावर असून शेतकऱ्यांच्या तोडांतला घास हिसकावल्या सारखी परिस्थिती साकरीटोला परिसरात निर्माण झाली आहे.
तालुक्यात पुजारीटोला धरणाच्या माध्यमातून अनेक गावांत शेतीला पाणी सिंचीत केले जाते. पाणी मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या डावा मुख्य कालव्यातून किंवा त्यामधून निघाणाऱ्या कालव्याच्या माध्यमातून पुरवठा करण्यात येते. झालिया साकरीटोला परिसरात शेतात पुरवठा होणारे पाणी ब्राम्हणीटोला जवळून निघणाऱ्या कुलपा मायनर आणि त्यातुन निघणाऱ्या झालिया मायनरच्या नावाने असलेल्या छोट्या कालव्यातुन मिळत असते. परंतु झालिया मायनरचे पाणी जेमतेम झालिया गावापर्यंत पोहोचते. त्यानंतर साकरीटोला गावाकडे कालवा कोरडाच पडून राहतो. त्यामुळे पाण्याचा थेंब सुद्धा साकरीटोला गावापर्यंत जाताना दिसत नाही. याला मुख्य कारण म्हणजे झालिया मायनरची अतिशय दुर्दशा झाली आहे. त्याला मागील अनेक वर्षापासून दुरुस्ती व कालव्याची खोलीकरण मुळीच करण्यात आले नाही. दुसरे म्हणजे कावराबांध, झालिया व पोवारीटोला येथील शेतकरी आपल्या शेतीला पाणी सिंचन करीत असताना गरजे पेक्षा कितीतरी जास्त पटीने आपल्या शेताकडे पाणी वळवण्याचे काम करीत असतात व ओव्हर फ्लो झालेले पाणी नाल्याकडे सोडतात. त्यामुळे साकरीटोला परिसरातील शेतकऱ्यांच्या वाट्याचे पाणी पुर्णपणे नाल्यात वाहून वाघनदीत जाते. पाण्याचे हकदार शेतकरी हक्काच्या पाण्यापासून मुकतात. त्यांची शेती पाण्याअभावी कोरडीच राहते. यंदा पावसाने शेवटी हुलकावणी दिली असून एका पाण्यासाठी धानपीक धोक्यात आले आहे. तसेच नहराचे पाणी सुद्धा शेतीत पोहोचत नाही. त्यामुळे साकरीटोला येथील शेतकरी हवालदील होण्याच्या वाटेवर आले आहेत. साकरीटोला परिसरात छोटा कालवा गेला असून त्या क्षेत्रात येणारी शेती ओलीत क्षेत्रात गणली जाते. त्यानुसार पाटबंधारे विभागाचे लोक पाणसारा वसूल करण्यासाठी नेहमी शेतकऱ्यांना सतावत असतात. मात्र त्यांच्या शेतीला कालव्याचे पाणी मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात संतापले आहेत. शेतकऱ्यांच्या समस्येकडे पाटबंधारे विभागाने त्वरीत लक्ष देत योग्य ती कारवाई करावी व येथील शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून निवेदन देण्यात आले आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा येथील शेतकरी मंगल सुलाखे, साहेबदास सुलाखे, खेमराज नवगोडे, मुन्ना नागपुरे, सुंदर मच्छिरके, गोपाल नेवारे, अनिल मेश्राम आदींनी दिला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Hundreds of single-crop crop risks due to water scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.